छत्रपती संभाजीनगर महिला संघाचा विक्रमी विजय

  • By admin
  • March 11, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

माधुरी आघाव, श्रुती पवारची शानदार शतके, मुक्ता मगरेची अष्टपैलू कामगिरी

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर महिला एकदिवसीय करंडक लीग क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महिला संघाने ४४४ धावांचा डोंगर उभारून मेट्रो महिला संघाचा तब्बल ३६८ धावांनी पराभव केला. 
या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या माधुरी आघाव (१५९), श्रुती पवार (१११) यांची धमाकेदार शतकी खेळी आणि कर्णधार मुक्ता मगरे हिची अष्टपैलू कामगिरी लक्षवेधक ठरली.

ओडीएम, किंग्ज धानोरी या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर व मेट्रो यांच्यात सामना झाला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांनी हा निर्णय अचूक ठरवताना ५० षटकात पाच बाद ४४४ असा धावांचा डोंगर उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. जिया सिंग आणि श्रावणी निटूरकर या सलामी जोडीने ८.२ षटकात ७२ धावांची भागीदारी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. श्रावणी मंगेश निटूरकर दोन चौकारांसह १० धावा काढून बाद झाली. जिया सिंग हिने ३५ चेंडूत ५४ धावांची वेगवान खेळी साकारत धावगती वाढवली. तिने १० चौकार मारले. शितल देशमुख १० धावांवर बाद झाली.

माधुरी आघाव आणि श्रुती पवार या जोडीने चौथ्या विकेटसाठी २३० धावांची भागीदारी करुन सामना एकतर्फी बनवला. माधुरी व श्रुती यांनी वादळी शतके झळकावत मैदान गाजवले. माधुरी आघाव हिने १२६ चेंडूंचा सामना करत १५९ धावांची धमाकेदार खेळी केली. माधुरीने आक्रमक दीडशतकी खेळीत २२ चौकार व एक षटकार मारला. श्रुती पवार हिने केवळ ७६ चेंडुत १११ धावा फटकावल्या. तिने १५ चौकार व १ षटकार मारला. दुर्दैवीरित्या श्रुती धावबाद झाली. कर्णधार मुक्ता मगरे हिने २३ चेंडूत नाबाद ४८ धावा फटकावल्या. मुक्ताने सहा चौकार व एक षटकार मारला. यशोदा घोगरे (०) नाबाद राहिली. इतर ५२ धावांचा बोनस लाभल्याने छत्रपती संभाजीनगर महिला संघाने ५० षटकात पाच बाद ४४४ असा धावांचा डोंगर उभारला. मेट्रो महिला संघाकडून तनिष्का तुंगे हिने ७१ धावांत दोन गडी बाद केले. मेघना तीळ हिने १ गडी बाद करताना तब्बल ९६ धावा मोजल्या.

मेट्रो महिला संघासमोर विजयासाठी ४४५ धावांचे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना मेट्रो संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार स्वाती पाटील (१५), माही द्विवेदी (१२), निहीरा (१९) यांनाच धावांचा दुहेरी आकडा गाठण्यात यश आले. अन्य फलंदाज झटपट बाद झाले. मेट्रो महिला संघाचा डाव २९.३ षटकात अवघ्या ७६ धावांत गडगडला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महिला संघाने तब्बल ३६८ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. 

छत्रपती संभाजीनगर संघाच्या दिव्या जाधव हिने सात धावांत चार विकेट घेत आपला ठसा उमटवला. कर्णधार मुक्ता मगरे हिने १३ धावांत तीन बळी घेतले. अक्षरा डांगे हिने १२ धावांत दोन गडी बाद केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *