
चंदीगड ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने बंगाल संघावर सहा विकेट राखून विजय साकारत आपली घोडदौड कायम ठेवली. या सामन्यात महाराष्ट्राच्या खुशी मुल्ला हिने आक्रमक शतक झळकावले तर गोलंदाजीत ६८ धावांत चार विकेट घेत अष्टपैलू ठसा उमटवला. महाराष्ट्र संघाने ४४.४ षटकात चार बाद २४१ धावा फटकावत दणदणीत विजय नोंदवला.
ताऊ देवी लाल मैदानावर हा सामना झाला. बंगाल महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात नऊ बाद २३८ धावसंख्या उभारली. द्यती पॉल हिने सर्वाधिक ६१ धावा फटकावल्या. तिने ४९ चेंडूंचा सामना करत ११ चौकार मारले. ब्रिस्टी माझी हिने सहा चौकारांसह ४० धावा काढल्या. स्नेहा गुप्ता हिने २० धावांचे योगदान दिले. तिने तीन चौकार मारले. षष्ठी मोंडल (२८), ह्रषिता बसु (नाबाद ३७), धारा गुज्जर (१६) यांनी आपले योगदान दिले.
महाराष्ट्र महिला संघाकडून खुशी मुल्ला हिने ६८ धावांत चार विकेट घेतल्या. श्वेता सावंत हिने ५१ धावांत दोन गडी बाद केले. उत्कर्षा कदम (१-२६), इशिता खळे (१-४७) व ईशा पठारे (१-३२) यांनी प्रभावी गोलंदाजी करत प्रत्येकी एक बळी घेतला.
महाराष्ट्र महिला संघासमोर विजयासाठी २३९ धावांचे लक्ष्य होते. महाराष्ट्र संघाने ४४.४ षटकात चार बाद २४१ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना सहजपणे जिंकला. सलामीवीर ईश्वरी अवसरे (५) लवकर बाद झाली. त्यानंतर खुशी मुल्ला व ईश्वरी सावकार हिने दुसऱया विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयाचा पाया भक्कमपणे रचला. ईश्वरी सावकार ४६ चेंडूत ३६ धावा काढून बाद झाली. तिने पाच चौकार मारले.
भाविका अहिरे हिने दोन चौकारांसह १७ धावांचे योगदान दिले. श्रद्धा गिरमे हिने ४८ चेंडूत ४० धावांची आक्रमक खेळी केली. तिने पाच चौकार मारले. एका बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत असताना सलामीवीर खुशी मुल्ला हिने शानदार नाबाद शतक झळकावत संघाच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. खुशी मुल्ला हिने १२३ चेंडूंचा सामना करत नाबाद ११९ धावांची खेळी केली. शतकी खेळी करताना खुशी हिने दोन उत्तुंग षटकार व १५ चौकार मारले. खुशी मुल्ला हिने गोलंदाजीत चार बळी आणि फलंदाजी करताना नाबाद शतक साजरे करत सामना गाजवला. आयशा शेख हिने एक षटकार व दोन चौकारांसह नाबाद १६ धावा काढल्या. बंगाल संघाकडून सुष्मिता गांगुली हिने ५२ धावांत दोन गडी बाद केले.