
छत्रपती संभाजीनगर ः ग्वाल्हेर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरुष खो-खो संघाने उपविजेतेपद पटकावले.
ग्वाल्हेर येथील विक्रांत विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धा झाली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला रोमहर्षक सामन्यात मुंबई विद्यापीठ संघाकडून दोन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या शानदार कामगिरीमुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा खो-खो संघ उडिपी येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. उपविजेत्या विद्यापीठ संघात विजय शिंदे, रोहित चव्हाण, सचिन पवार, अनिकेत पवार, रमेश वसावे, किरण वसावे, ओंकार दळवी, तेजस सावंत, भरत वासावे, श्री शंभू पेठे, श्याम ढोबळे, अनंत साठले, रूद्र थोपटे, अथर्व ढाणे, रवी वसाव आदी खेळाडूंचा समावेश होता.
या खेळाडूंना डॉ चंद्रजीत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या संघासोबत प्रशिक्षक म्हणून डॉ पठाण युसुफ तर व्यवस्थापक म्हणून डॉ कपिल सोनटक्के यांनी काम पहिले.
या घवघवीत यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, विद्यापीठाचे प्रशिक्षक मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीतसिंग दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी विजयी खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले.