
यवतमाळ येथे स्पर्धेचे शानदार आयोजन
यवतमाळ ः श्री बहुउद्देशीय संस्था व यवतमाळ जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भावनाताई गवळी आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेमध्ये एनबीवायएस नागपूर संघाने यवतमाळ संघाला सात गुणांनी हरवून आमदार चषक पटकावला. डीकेएम नागपूर संघ तृतीय क्रमांकावर राहिला तर चतुर्थ क्रमांक डीसीसी अमरावती संघाने मिळवला. पाचव्या क्रमांक वर्धा संघाने संपादन केला.
श्री बहुउद्देशीय संस्था व यवतमाळ जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार भावनाताई गवळी आमदार चषक बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या बास्केटबॉल मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेला आलेल्या सर्व खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली होती.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड उपस्थित होते तर श्री बहुउद्देशीय संस्थेचे सचिव जगदीश खोरगडे, उपाध्यक्ष सुधांशू काळे व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
लीग कम नाॅकआउट स्पर्धेमध्ये सर्व सामने अत्यंत अटीतटीचे झाले. अंतिम सामन्यांमध्ये एनबीवायएस नागपूर संघाने यवतमाळ संघाचा अवघ्या सात गुणांनी पराभव करीत आमदार चषक व रोख पारितोषिक पटकावले. स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देण्यात आले. तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱया खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली.
बक्षीस समारंभाकरिता यवतमाळचे युवा नेते पिंटू भाऊ बांगर तसेच राजुभाऊ डांगे, सचिव जगदीश खोरगडे, उपाध्यक्ष सुधांशू काळे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, यवतमाळ जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव अनंत पांडे व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात आले.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विकास शेळके, राहुल ढोणे, लीलाधर निनगुरकर तसेच श्री बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, यवतमाळ जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सर्व पदाधिकारी खेळाडू यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश जोशी यांनी केले व आभार मानले.