
चिपळूण : येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून गेली ११ वर्षे डेरवण येथे आयोजित करण्यात येत असलेल्या डेरवण यूथ गेम्समध्ये सर्व खेळाडूंना खेळ आणि संस्कार यांचे मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी दिली.
डेरवण यूथ गेम्समध्ये विविध प्रकारच्या क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी आहेच. त्याचबरोबर शिस्त, प्रयत्नामध्ये सातत्य व स्वच्छता आदी जीवनमूल्ये शिकण्यास मिळत आहेत, असे सांगून त्यांनी येथील स्पर्धा या सर्व वयोगटातील नवोदितांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यामुळे केवळ कोकणातील नव्हे तर विविध प्रांतातील सर्व नवोदित आणि अनुभवी खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करून दाखविण्याची संधी देणारी राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा ही डेरवण यूथ गेम्स मानली जाते, असे अभिमानाने श्रीकांत पराडकर यांनी सांगितले.

श्रीकांत पराडकर पुढे म्हणाले की, “प्रत्येक खेळाडूला तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तर अशा टप्प्याने खेळावे लागते. मात्र डेरवण यूथ गेम्सचे वैशिष्ट्य असे आहे की, सर्व खेळाडूंना संधी दिली जाते. त्यामुळे नवोदित खेळाडूंना देखील राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळते. ग्रामीण भागातूनही उच्च खेळाडू निर्माण व्हावेत असे संस्थेचे उद्दिष्ट असल्याने इच्छुक स्पर्धकांना नाममात्र प्रवेश शुल्कात या स्पर्धा खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. डेरवण यूथ गेम्स ही नवोदितांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत असलेली फिजिओथेरपी व आहाराचे महत्त्व याबाबतची जागृती, यासाठी डेरवण यूथ गेम्सच्या सात दिवसांच्या कालावधीत आहार आणि आरोग्य या विषयांवर खेळाडूंना उत्तम मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांच्या क्षमता वाढीसाठी ते पूरक ठरत आहे. त्यामुळे डेरवण क्रीडा संकुल हे खेळाडूंना घडविणारे अद्ययावत संकुल असल्याचे खेळाडू व पालक यांचे मत आहे. येथील स्पर्धेमध्ये अनुभवी राष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याचीही संधी नवोदित खेळाडूंना मिळत आहे. येथील मुलींच्या फुटबॉल स्पर्धासुद्धा अल्पावधीत प्रसिद्धीस पावल्या आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक, हरियाणा यांसह विविध राज्यातील मुली फुटबॉल स्पर्धेत सहभाग घेत आहेत. याच स्पर्धेत नवोदित पंचांनाही प्रशिक्षण मिळून उत्तम अनुभव मिळत आहे. १२, १४ व १६ या वयोगटातील स्पर्धकांसाठी दोन, चार व सहा किलोमीटर अंतरासाठी घेण्यात येणारी क्रॉसकंट्री ही स्पर्धा म्हणजे संस्थेचा एक वेगळा उपक्रम आहे. या स्पर्धेला देखील दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळतो. साधारणतः एक हजार ते बाराशे स्पर्धक या स्पर्धेत भाग घेतात. कबड्डी, खो-खो या खेळांबरोबरच शूटिंग, आर्चरी, स्विमिंग तसेच ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या वॉल क्लायबिंग या स्पर्धादेखील एकाच ठिकाणी घेतल्या जात असल्याने तमाम कोकणवासीयांसाठी वेगळी ओळख करून देणारी, अशी ही स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या डेरवण यूथ गेम्स या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढत आहे. परिणामी ट्रस्टचे उद्दिष्ट क्रमाक्रमाने फळाला येत असल्याचे दिसून येत आहे,” असे श्रीकांत पराडकर यांनी आवर्जून सांगितले.