
कर्णधार जान्हवी रंगनाथनची प्रभावी गोलंदाजी
नागपूर ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत पुण्यात झालेल्या सामन्यात विदर्भ महिला संघाने आंध्र प्रदेश महिला संघावर ७ विकेट्सने मात केली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा आंध्र प्रदेश महिला संघाचा निर्णय फारसा यशस्वी झाला नाही. कारण त्यांनी त्यांचे दोन्ही सलामीवीर केवळ १७ धावा असताना गमावले. हेमा रोशनी (३१) आणि कर्णधार हेन्रिएटा परेरा (२०) यांनी थोडा प्रतिकार केला. परंतु नंतर त्यांचा डाव गडगडला.
विदर्भाची कर्णधार जान्हवी रंगनाथनने डावाच्या २८ व्या षटकात तीन विकेट्स घेत त्यांच्या मधल्या फळीला मोठा धक्का दिला. जान्हवीने पहिल्याच चेंडूवर वासवी पवनी (९), तिसऱ्या चेंडूवर हर्षिता (०) आणि पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाथरी (०) यांना बाद केले. जान्हवीने १० षटकांत २७ धावांत ४ बळी घेत आंध्र संघ १३३ धावांत गारद केला.
विदर्भाने धावांचा पाठलाग करताना सुरुवातच निराशाजनक केली आणि त्यांचे तीन फलंदाज फक्त ३३ धावांत बाद झाले होते. परंतु फॉर्ममध्ये असलेल्या आयुषी ठाकरे आणि धार्वी टेंभुर्णे यांनी मिळून आंध्र संघाला खेळातून बाहेर काढले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १०९ चेंडूत १०१ धावांची भागीदारी करत २८.३ षटकांत विजय निश्चित केला.
धार्वी ५९ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ५५ धावांवर नाबाद राहिली तर आयुषीने ५० चेंडूत पाच चौकारांसह नाबाद ३५ धावा केल्या.
विदर्भाचे आता चार सामन्यांत १२ गुण आहेत. बाद फेरीसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांना गुरुवारी होणाऱ्या शेवटच्या सामन्यात बडोद्यावर मात करावी लागेल.
संक्षिप्त धावफलक : आंध्र प्रदेश महिला संघ ः ४७ षटकांत सर्वबाद १३३ (हेमा ३१, अंजुम २३, तमन्ना २३, जान्हवी रंगनाथन ४-२७) पराभूत विरुद्ध विदर्भ महिला संघ ः २८.४ षटकांत तीन बाद १३४ (आयुषी ठाकरे नाबाद ३५, धार्वी टेंभुर्णे नाबाद ५५).
