
चिपळूण: डेरवण यूथ गेम्स महोत्सवाला खो-खो स्पर्धेने प्रारंभ केला. या स्पर्धेत खो-खो मध्ये १४ व १८ वर्षांखालील मुले व मुलींच्या संघांसह महाराष्ट्रभरातील ६० संघांनी भाग घेतला आहे.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात २४ संघ, मुलींच्या गटात १४ संघ, १८ वर्षांखालील मुलांच्या गटात १६ संघ, आणि मुलींच्या गटात ६ संघांचा सहभाग आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक मिळून एकूण ९०० जण सहभागी आहेत.
साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणारी या स्पर्धेच्या अंतिम लढती १३ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात रमणबाग पुणे, श्रीराम एज्युकेशन रत्नागिरी, पेडणेकर हायस्कूल रत्नागिरी, इगल्स पुणे, श्री सह्याद्री मुंबई उपनगर, तुळकाई सांगली, सह्याद्री पुणे, खंडाळा सातारा, महात्मा गांधी मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, मावळी ठाणे, ग्रीफींग ठाणे, सरस्वती मुंबई, ज्ञानविकास ठाणे, राज क्रीडा मंडळ ठाणे तर मुलींच्या गटात होळकर सांगली, इगल्स पुणे, आर्यन रत्नागिरी, क्रीडाप्रबोधिनी जालना, साखरवाडी सातारा, ज्ञानविकास ठाणे या संघानी बाद फेरीत प्रवेश केला. १८ वर्षांखालील मुलांच्या गटात महात्मा गांधी उपनगर, देवा स्पोर्ट्स पुणे, पंचशील सांगली तर मुलींच्या गटात आर्यन रत्नागिरी, नानासाहेब पाटील विद्यालय जालना, रा फ नाईक ठाणे, काळे विद्यालय सोलापूर या संघानी बाद फेरीत प्रवेश केला.
मुलांच्या गटात श्रीराम एज्युकेशन रत्नागिरी संघाने सांगलीच्या होळकर संघावर १६ -१४ असा विजय मिळवत गटात अव्वल स्थान राखले. ग्रीफिन ठाणे संघाने संभाजीनगर संघावर एक डाव ९ गुणांनी दणदणीत विजय मिळवत बाद फेरीत प्रवेश केला.
किशोर गटात सह्याद्री उपनगर संघाने गटातील शेवटच्या सामन्यात आहिल्यादेवी सांगली संघावर एक डाव १५ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. रमणबाग पुणे संघाने क्रांतीज्योती सातारा संघावर २ गुणांनी निसटता विजय मिळविला.
किशोरी गटात आहिल्यादेवी सांगली संघाने इगल्स पुणेचा एक डाव ६ गुणांनी पराभव केला. आहिल्यादेवी संघाकडून श्रावणी तामखडेने अष्टपैलू खेळ करीत ३.४० सेकंद सरक्षण करताना आक्रमणात ३ गुण मिळवले. रा. फ. नाईक ठाणे संघाने सुळकाई सांगली संघावर एक डाव ५ गुणांनी विजय मिळवला. यात प्रणिती शिंदेने ३.२० सेकंद संरक्षण केले.
१८ वर्षांखालील मुलींच्या गटात आर्यन स्पोर्ट्स रत्नागिरी संघाने जालनावर १ गुण व ७ मिनिटे राखून विजय मिळविला. या सामन्यात राष्ट्रीय खेळाडू रिद्दी चव्हाण हिने ४.१० व २.३० सेकंद संरक्षण करताना आक्रमणात ३ ३ गुण वसूल केले.