
मुंबई ः महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आणि सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहयोगाने आयोजित ५८ व्या सब ज्युनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातील अनेक युवा खेळाडूंनी आपली खेळाची धार दाखवली. आयुष गरुड, तनया दळवी, प्रसन्ना गोळे व निधी सप्रे यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या आयुष गरुडने मुंबईच्या रुद्र गवारेला १९-९, १५-१ या सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजेतेपद मिळवले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूरच्या ओंकार वडारने ठाण्याच्या वेदांत पाटणकरवर २१-०, २१-४ असा विजय मिळविला.
१४ वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबई उपनगरच्या तनया दळवीने रत्नागिरीच्या स्वरा कदमला तीन सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षात १४-११, १२-१५, १९-५ अशा रोमांचक विजयासह विजेतेपद पटकावले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत रत्नागिरीच्या स्वरा मोहिरेने पुण्याच्या तनया पाटीलवर ११-४, २-१७, ७-६ असा निसटता विजय मिळविला.
१२ वर्षांखालील मुलांच्या गटात मुंबई उपनगरच्या प्रसन्ना गोळेने सिंधुदुर्गच्या भारत सावंतला २१-९, २१-० असा सहज विजय मिळवून राज्य अजिंक्यपद आपल्या नावे केले. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पालघरच्या देवराज कथाडेने पुण्याच्या रुद्रा इंगळेवर २१-०, २१-६ अशी मात केली.
१२ वर्षांखालील मुलींच्या गटात रत्नागिरीच्या निधी सप्रेने ठाण्याच्या देविका जोशीला २२-०, २३-० अशा थेट विजयासह विजेतेपद जिंकले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ठाण्याच्या जान्हवी पानवलकरने सिंधुदुर्गच्या दिव्या राणेला ७-४, ८-१५, १२-९ अशा नाट्यमय लढतीत पराभूत केले.
विजेत्यांना राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले आणि मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम संघटनेचे सहसचिव संजय बर्वे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.