
मुंबई : शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात झालेल्या पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत अंबिका सेवा मंडळ, कुर्ला आणि पंढरीनाथ सेवा मंडळ, चुनाभट्टी यांच्या संघांनी आपला दबदबा निर्माण करत विजेतेपद जिंकले.
पहिल्या श्रेणी पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात अंबिका सेवा मंडळाने भानवे अकादमीला ३० विरुद्ध १४ गुणांनी आरामात पराभव केला. अंबिकाच्या शुभम दिडवाघने शानदार चढायांवर नियंत्रण ठेवत संघाची बाजी निश्चित केली. तर भानवेच्या करणसिंगने जबरदस्त पकडी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम चढाई व पकडपटू म्हणून गौरविण्यात आले.
दुसऱ्या श्रेणी पुरुष गटात पंढरीनाथ सेवा मंडळाने हनुमान क्रीडा मंडळाला २८ विरुद्ध ५ गुणांनी धूळ चारून विजय प्राप्त केला. पंढरीनाथ संघाचा ओमकार कदम या सामन्यात चमकला, तर हनुमान क्रीडा मंडळाचा सौरभ घाग मात्र एकटा लढत असताना टीमच्या पराभवाला थांबवू शकला नाही.
स्पर्धेतील उपांत्य फेरीत अंबिका संघाने शूर संभाजीचा आणि भानवेने शितला देवीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या श्रेणी गटात पंढरीनाथने जाणता राजाचा आणि हनुमानने छावा बॉईज संघाचा पराभव केला.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना रोख रक्कमेची पारितोषिके व आकर्षक चषक देण्यात आले. स्पर्धेची यशस्विता सुनिश्चित करण्यासाठी जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच, कबड्डी प्रेमींनी स्पर्धेला दिलेल्या उत्तम प्रतिसादाने एक नवा उत्साह निर्माण केला.