
छत्रपती संभाजीनगर ः ठाणे येथे झालेल्या ३५व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या बाबासाहेब मंडलिक, रुपाली राणे, अश्विनी वाघ यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी नोंदवत पदकांची कमाई केली आहे.
राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेत बाबासाहेब मंडिलक यांनी २०० मीटर धावणे या प्रकारात २२.०५ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले. रुपाली राणे यांनी वुशू या प्रकारात ६५ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. तसेच रुपाली राणे यांनी कुस्ती या खेळात आपले कौशल्य दाखवत ६५ किलो वजन गटात कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत त्यांनी दोन पदके जिंकली आहेत. अश्विनी वाघ यांनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात ८७ पेक्षा अधिक किलो वजन गटात कांस्यपदक जिंकून घवघवीत यश संपादन केले.
या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त शिलवंत नांदेडकर, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त मनोज पगारे, राखीव पोलिस निरीक्षक प्रल्हाद राठोड यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. या खेळाडूंन क्रीडा विभाग प्रमुख अजमद शेख व आसिफ शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.