
लाईफलाईन-मस्सिया औद्योगिक क्रिकेट ः मधुर पटेल, रुद्राक्ष बोडके यांची धमाकेदार शतके
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मस्सिया औद्योगिक टी २० क्रिकेट स्पर्धेत मधुर पटेल (११५) आणि रुद्राक्ष बोडके (११०) यांच्या धमाकेदार शतकाच्या बळावर मस्सिया अ संघाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर १३९ धावांनी दणदणीत विजय साकारत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात रुद्राक्ष बोडके याने सामनावीर किताब संपादन केला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. मस्सिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मधुर पटेल व रुद्राक्ष बोडके या फलंदाजांनी धमाकेदार शतके ठोकून हा निर्णय योग्य ठरवला. मस्सिया अ संघाने २० षटकात दोन बाद २४१ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रत्युत्तरात जॉन्सन अँड जॉन्सन संघ १९ षटकात १०२ धावांवर सर्वबाद झाला. मस्सिया अ संघाने तब्बल १३९ धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात मधुर पटेल याने अवघ्या ६० चेंडूत ११५ धावांची दमदार खेळी करुन मैदान गाजवले. शतकी खेळी करताना मधुर पटेल याने षटकारांचा पाऊस पाडला. त्याने तब्बल ११ उत्तुंग षटकार ठोकले हे विशेष. सहा सुरेख चौकार देखील मारले. रुद्राक्ष बोडके याने ५६ चेंडूत ११० धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याने सहा उत्तुंग षटकार व ११ चौकार मारले. अनिरुद्ध शास्त्री याने २० चेंडूत २३ धावांची वेगवान खेळी केली. त्याने पाच चौकार मारले. गोलंदाजीत दत्ता बोरडे याने २८ धावांत तीन विकेट घेऊन ठसा उमटवला. कृष्णा पवार याने ४ धावांत दोन गडी बाद केले. रुद्राक्ष बोडके याने १७ धावांत दोन विकेट घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संक्षिप्त धावफलक ः मस्सिया अ ः २० षटकात दोन बाद २४१ (मधुर पटेल ११५, रुद्राक्ष बोडके नाबाद ११०, प्रवीण क्षीरसागर १-५२, खेसर १-५८) विजयी विरुद्ध जॉन्सन अँड जॉन्सन ः १९ षटकात सर्वबाद १०२ (प्रवीण क्षीरसागर १२, पांडुरंग रोडगे ६, अनिरुद्ध शास्त्री २३, दीपक खानविलकर ७, राहुल काळे १४, खेसर ६, निलेश पाटने ७, इतर २२, दत्ता बोरडे ३-२८, रुद्राक्ष बोडके २-१७, कृष्णा पवार २-४, रोहन राठोड १-१२, धर्मेंद्र वासानी १-१६). सामनावीर ः रुद्राक्ष बोडके.