
डेरवण यूथ गेम्स
चिपळूण : डेरवण यूथ गेम्स स्पर्धेत लंगडी क्रीडा प्रकारात मांडकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या संघाने विजेतेपद पटकावले.
आपल्या मातीतील अनेक खेळ लोप पावत चाललेले असून, ते खेळ टिकविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एसव्हिजेसिटीने या यूथ गेम्सच्या माध्यमातून लंगडी, कबड्डी, खो-खो या क्रीडा प्रकारासह ऑलिम्पिकमधील खेळांची ओळख ग्रामीण भागातील खेळाडूंना व्हावी यादृष्टीने विविध १८ खेळांच्या स्पर्धा दरवर्षी खेळवण्यात येतात. यूथ गेम्सचे यंदाचे ११ वे वर्ष आहे.
या गेम्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या लंगडी या खेळात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मांडकी या प्रशालेने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम तर याच वयोगटातील मुलींमध्ये द्वितीय तसेच १५ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम व याच वयोगटातील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविताना १५ वर्षांखालील मुलांमध्ये विनीत सुनील घाणेकर या खेळाडूंने उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळविले आहे.
१२ वर्षांंखालील मुलांमध्ये एस डी गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल संघाने प्रथम तर मांडकी जिल्हा परिषद शाळेच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. या गटात एस डी गद्रे स्कूलचा संकल्प सकपाळ हा उत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. १२ वर्षांखालील मुलींच्या गटात पालवण जिल्हा परिषद शाळेने प्रथम तर मांडकी येथील जिल्हा परिषद शाळेने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर या गटात पालवण शाळेची पूर्वी सचिन भुवड ही उत्कृष्ट खेळाडू ठरली आहे. १५ वर्षांखालील मुलांच्या गटात मांडकी जिल्हा परिषद शाळेने प्रथम तर समता क्रीडा भवन या प्रशालेने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर १५ वर्षांखालील मुलींच्या गटात शिर्के हायस्कूल प्रथम तर मांडकी जिल्हा परिषद शाळा संघाने द्वितीय क्रमांक संपादन केला आहे. या गटात शिर्के हायस्कूलची वैष्णवी सुशील फुटक ही विद्यार्थीनी उत्कृष्ट खेळाडू ठरली आहे.