
चिपळूण : डेरवण यूथ गेम्स स्पर्धेत बास्केटबॉल खेळात सातारा इंग्लिश मीडियम स्कूल संघाने वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावले.
डेरवण येथे सुरू असलेल्या ११व्या यूथ गेम्समध्ये विविध १८ खेळांच्या स्पर्धा पार पडत असून या स्पर्धेच्या निमित्ताने एसव्हिजेसिटी क्रीडा संकुलास क्रीडानगरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या यूथ गेम्समध्ये बास्केटबॅाल स्पर्धेमध्ये सातारा इंग्लिश मीडियम स्कूलने वर्चस्व गाजवत घवघवीत यश मिळवले आहे.
या स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींमध्ये सातारा इंग्लिश मीडियम स्कूल संघाने प्रथम तर प्रिन्स युनायटेड या प्रशालेने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. १४ वर्षांखालील मुलींमध्ये एन.बी. हुप्स (अ ) २२ गुण मिळवून प्रथम तर सातारा इंग्लिश मीडियम स्कूलने २० गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. १४ वर्षांखालील मुलांमध्ये रणजित अकॅडमीने २१ गुण मिळवून प्रथम व फ्लाय बास्केटबॉल (अ) संघाने द्वितीय क्रमांक संपादन केला. १६ वर्षांखालील मुलांमध्ये सातारा इंग्लिश मीडियम स्कूलने ३० गुण मिळवून प्रथम व फ्लाय बास्केटबॅाल संघाने २० गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
सातारा येथील सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विजेत्या संघाला चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, योगेश विचारे यांच्या उपस्थितीत पारितोषिक प्रदान करुन गौरवण्यात आले.
खेळाडूंचा उत्साह वाढवणारे क्रीडा संकुल
आम्ही आमचे संघ घेऊन अनेक ठिकाणी खेळण्यासाठी जातो. परंतु अनेक ठिकाणी बास्केटबॅाल खेळण्यासाठी खुल्या पद्धतीचे कोर्ट उपलब्ध असते. अशा विविध प्रकारच्या खुल्या वातावरणात खेळताना खेळाडूंचे मानसिक संतुलन बिघडण्याच्या घटना आम्ही नेहमीच पाहतो. परंतु डेरवण येथील एसव्हिजेसिटी या क्रीडा संकुलात अद्ययावत असे बंदीस्त कोर्ट उपलब्ध असल्याने खेळाडूंचा उत्साह तर द्विगुणित होतो. पण, खेळावर लक्ष्य केंद्रित करून आपले ध्येयही साध्य करता येते. त्यामुळे संस्थेने अशा पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून बास्केटबॅालसह इतर खेळांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया साताऱ्याचे वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केली.