डेरवण यूथ गेम्स
चिपळूण : डेरवण यूथ गेम्स स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले. १८ वर्षांखालील मुलींच्या गटात रा. फ. नाईक, ठाणे विरुद्ध वसंतराव काळे, सोलापूर या दोन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत रंगणार आहे. इतर गटातील अंतिम सामने १३ मार्च रोजी रंगणार आहेत.
किशोर गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात शिवप्रतिष्ठान सातारा संघाने सह्याद्री, मुंबई उपनगरवर तर ग्रिफीन, ठाणे संघाने ज्ञानविकास, ठाणेवर १ गुणाने निसटता विजय मिळविला. मावळी मंडळ, ठाणे संघाला राजश्री शाहू छत्रपती संभाजीनगर संघाकडून चार गुणांनी पराभव पत्करावा लागला. तर रमणबाग पुणे संघ इगल्स, पुणे विरुद्ध एक डाव ७ गुणांनी विजयी झाला.
किशोरी गटात राजमाता, पुणे संघाने इगल्स, पुणेचा १ डाव ६ गुणांनी तर आहिल्यादेवी सांगली संघाने आर्यन, रत्नागिरीचा एक डाव ८ गुणांनी पराभव केला. क्रीडा प्रबोधिनी, जालना संघाने साखरवाडी, सातारा संघावर ४.५० मि. राखून तर क्रांतीज्योती, साताराने ज्ञानविकास, ठाणे यांचा ५ गुणांनी पराभव केला. कुमार गटात शिर्शेकर, मुंबई उपनगरने शिवसमर्थ, सांगलीवर १ डावाने तर विहंग, ठाणेने विवेकानंद, सोलापूरवर ४.१० मि. राखून विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
किशोर गटात ग्रिफीन विरुद्ध ज्ञानविकास या चुरशीच्या सामन्यात ग्रिफीन संघाकडून अरुण गरेलने १.३० मि. व १.४० मि. संरक्षण करून आक्रमणात तीन गडी बाद केले. साई भोंडकरने १.१० मि. व १.३० मि. संरक्षण केले. दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात शिवप्रतिष्ठान सातारा संघाने सह्याद्री, मुंबई उपनगर संघावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. शिवप्रतिष्ठानकडून वरद पोळने ५ मि. संरक्षण केले. त्याला स्वराज गाढवेने दोन्ही डावात नाबाद १ मि. संरक्षण करून चांगली साथ दिली.