स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा ः डॉ कानन येळीकर 

  • By admin
  • March 13, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

छत्रपती शाहू महाराज संस्था येथे कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्याचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर ः  कांचनवाडी येथील छत्रपती शाहू महाराज संस्था येथे इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाचे उद्घाटन सीएसएमएसएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय अधिष्ठाता डॉ. कानन अविनाश येळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर सहाय्यक परिवहन अधिकारी सविता शिवाजी पवार, वेदांतनगर पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक प्रविणा यादव, भरोसा सेल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सहाय्यक पोलिस निरीक्षक आरती शेषराव जाधव, सातारा पोलीस स्टेशन पोलिस उपनिरीक्षक निर्मला राख, कॉन्स्टेबल गीता थोटे या कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांचा सत्कार इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष विजया नानकर, सचिव मनीषा चिपळूणकर, प्रोजेक्ट मॅनेजर लता मुळे यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ कानन येळीकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्री म्हणजे त्याग, प्रेम, कणखरपणा आणि प्रेरणा. ती एक आई आहे, जी संपूर्ण आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटते. ती एक बहिण आहे, जी कायम आपल्या भावाच्या पाठीशी उभी असते. ती एक पत्नी आहे, जिला आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखाची चिंता असते आणि ती एक मुलगी आहे, जिला कुटुंबासाठी काहीही करण्याची जिद्द असते.

सविता पवार म्हणाल्या की प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, आणि ही गोष्ट खरीच आहे. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण किंवा सहकारी स्त्री आपल्या विविध भूमिकांतून आपल्या आयुष्याला दिशा देते, पाठिंबा देते.

प्रविणा यादव म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी स्त्रियांना केवळ ‘चूल आणि मूल’ या मर्यादेत पाहिले जात असे. मात्र, आजच्या काळात स्त्रिया कुटुंब सांभाळण्यासोबतच शिक्षण, व्यवसाय, संशोधन, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करत आहेत.

आरती जाधव म्हणाल्या की, महिला त्या केवळ घराचे घरपण जपत नाहीत, तर समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे आजचा दिवस केवळ त्यांचा सन्मान करण्याचा नाही, तर त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवण्याचा आहे.

लता मुळे यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना सांगितले की, स्त्रीशक्तीचा पुरेपूर वापर करून एक चांगली व्यक्ती बनवून दाखवा. आपले वाचन, लेखन इत्यादी छंद जोपासून नेहमी आनंदी रहा. कोणत्याही क्षेत्रात आपला चांगला ठसा उमटवा. आत्मनिर्भर बना. ईश्वराने दिलेल्या सुंदर स्त्री जन्माचा उपयोग करताना कधीच पंखातलं बळ कमी होऊ देऊ नका. थोर स्त्रियांचे विचार, चारित्र्य सदैव स्मरणात ठेवा.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ इना नाथ यांनी केले. यावेळी इनरव्हील क्लब, छत्रपती संभाजीनगर सदस्य अंजली सावे, रूपल गुरसहानी, भावना मुळे, शिवानी लड्डा, उषा धामणे, वृषाली उपाध्ये, अलका मेहता, वर्षा पटेल, प्रतिभा धामणे, शामल भोगले, मंगल चव्हाण, रेखा केदारे, माधुरी अहीरराव, आशा भांड, चंदा धोंगडे, वसुंधरा पाटील, हिरा पेरे पाटील, छाया भोयर, उषा सूर्यवंशी, सुनीता बाजपेयी, स्वाती धूत, सुरेखा बांगड, मनोरमा मालपाणी, डॉ लता काळे, डॉ जयश्री देशमुख आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *