
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयात वाणिज्य विभाग व एनआयएसएम अंतर्गत राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रभाकर उदावंत हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ राजेश लहाने यांनी या कार्यशाळेचा उद्देश सांगितला. विद्यार्थ्यांनी एनआयएसएम राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा प्रशिक्षणात सहभागी व्हावे तसेच हा वित्तीय कौशल्य विकसित करणे, त्यांना आर्थिक साक्षर बनविणे हा आहे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा प्रशिक्षण कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रभाकर उदावंत यांनी राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा ही राष्ट्रीय पातळीवर घेण्यात असून तिचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे आणि जास्तीत जास्त देश पातळीवरील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे हा आहे. सदरील स्पर्धा देशपातळीवर तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रथम ऑनलाइन स्क्रीनिंग प्रश्नमंजुषा नंतर देशपातळीवरील सात विभागीय प्रादेशिक स्तरावर आणि शेवटी प्रादेशिक फेरीतील सर्वोत्तम स्पर्धक महाअंतिम राष्ट्रीय स्तरावर (ग्रँड फिनाले) प्रश्नमंजुषा फेरी घेण्यात येणार आहे. यावर्षी या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे, रोख बक्षीस, ट्रॉफी, प्रमाणपत्रासह एकूण २१ लाख रुपये किमतीची बक्षिसे देण्यात येणार आहेत अशी माहिती दिली आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शंका दूर केल्या.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर यांनी राष्ट्रीय आर्थिक साक्षरता प्रश्नमंजुषा शिक्षण कार्यक्रम वाणिज्य विभागाने आयोजित केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. सदरील प्रश्नमंजुषा कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एनआयएसएमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. अंतिम मुदतीपूर्वी स्वतःची किंवा तुमच्या टीमची नोंदणी करा, विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषाचा सराव करावा आणि अव्वल स्थानासाठी ध्येय ठेवा. तुम्हाला यश निश्चितच मिळेल.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर, उपप्राचार्य अपर्णा तावरे, रवी पाटील आणि गणेश मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले. सदरील प्रशिक्षणासाठी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील ३५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यशाळेसाठी समन्वयक म्हणून राजेश लहाने यांनी कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास ठोंबरे यांनी केले. अविनाश धोत्रे यांनी आभार मानले.