
नंदुराबर येथे महिला दिनानिमित्त मुलींसाठी बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन
नंदुरबार : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार व नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी विशेष बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राची सुरुवात येथील श्रीमती श्रॉफ हायस्कूल येथे करण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सुषमा शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्याध्यापक राजेश शहा, पर्यवेक्षक भिकू त्रिवेदी, क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, अमोल जाधव, बॉक्सिंग संघटनेचे डॉ मयूर ठाकरे, पर्यवेक्षिका सीमा पाटील, क्रीडा शिक्षक जगदीश वंजारी, मनीष सनेर, हेमचंद्र मराठे, श्रॉफ हायस्कूल शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका सुषमा शाह म्हणाल्या की, बॉक्सिंग हा केवळ एक खेळ नसून, तो आत्मसंरक्षणाचे महत्त्वपूर्ण साधन आहे. आजच्या काळात मुलींनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. बॉक्सिंगच्या माध्यमातून केवळ स्वसंरक्षणाचे धडे मिळत नाहीत, तर आरोग्य चांगले राहते आणि भविष्यात या खेळात करिअर करण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे मुलींनी मोठ्या संख्येने या खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या वेळी बॉक्सिंग क्रीडापटूंनी बॉक्सिंग प्रात्यक्षिके सादर करत या खेळाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. खेळाडूंच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सदर कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले.