
पुणे ः जम्मू-काश्मीर राज्यातील गुलमर्ग येथे झालेल्या पाचव्या खेलो इंडिया विंटर गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावत एकूण १३ पदकांची कमाई केली. त्यात तीन सुवर्ण, पाच रौप्य व पाच कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्राची स्टार खेळाडू उर्मिला पाबळे हिने स्नोबोर्ड प्रकारात सुवर्णपदक पटकावत स्पर्धा गाजवली. सिद्धार्थ गाडेकर याने १ सुवर्ण आणि १ रौप्यपदक जिंकून स्की माउंटेनियरिंगमध्ये आपली उत्कृष्टता दाखवली.
महाराष्ट्र संघाच्या चमकदार कामगिरीबद्दल एसएसआय अध्यक्ष शिवा केशवन, महाराष्ट्र स्की अँड स्नोबोर्ड असोसिएशनचे अध्यक्ष अॅड आनंद लाहोटी, जीटीसीसीचे सह अध्यक्ष रूपचंद नेगी, एसएसएमचे सचिव प्रदीप राठोड, एमएसआरएचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव डॉ दयानंद कुमार, सीडीएम मिलिंद दीक्षितआणि मारिया सॅम्युअल यांनी संपूर्ण महाराष्ट्र संघाचे त्यांच्या अविश्वसनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
खेलो इंडिया विंटर गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी बजावली. खेळाडूंनी दाखवलेले कौशल्य पाहता आगामी काळात महाराष्ट्राचे खेळाडू विंटर गेम्स स्पर्धेत अधिक प्रभावी कामगिरी बजावतील याची खात्री वाटते. खेळाडूंनी मिळवलेल्या यशाने इतर खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळेल असे अध्यक्ष आनंद लाहोटी यांनी सांगितले.