
ईशा पाठारे, खुशी मुल्ला, ईश्वरी सावकार, ईश्वरी अवसरे, भाविका अहिरे यांची चमकदार कामगिरी
चंदीगड ः बीसीसीआयतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अंडर २३ महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने धमाकेदार कामगिरी कायम ठेवत गुजरात महिला संघाचा तब्बल १६६ धावांनी पराभव केला. या विजयासह महाराष्ट्र महिला संघ बाद फेरीत दाखल झाला आहे.
चंदीगड येथील जीएमएसएसएस सेक्टर २६ क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात पाच बाद २७५ अशी भक्कम धावसंख्या उभारून सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात महिला संघ ३७.३ षटकात अवघ्या १०९ धावांत गारद झाला. महाराष्ट्र महिला संघाने १६६ धावांनी दणदणीत विजय साकारत बाद फेरीत प्रवेश केला आहे.
महाराष्ट्र महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना शानदार फलंदाजी केली. ईश्वरी अवसरे हिने ४० चेंडूत ४९ धावा फटकावल्या. तिने दोन षटकार व सात चौकार मारले. तिचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. मात्र, खुशी मुल्ला, ईश्वरी सावकार व भाविका अहिरे यांनी दमदार अर्धशतके ठोकत संघाची स्थिती भक्कम केली. खुशी मुल्ला हिने ८५ चेंडूत ५४ धावा काढल्या. तिने सात चौकार मारले. ईश्वरी अवसरे हिने ८७ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. तिने चार चौकार मारले. भाविका अहिरे हिने ४७ चेंडूत ५४ धावांची वेगवान खेळी केली. तिने आठ चौकार मारले. आयशा शेख हिने १३ चेंडूत दोन षटकार व दोन चौकार ठोकत २९ धावा फटकावल्या. श्वेता सावंत नाबाद ७ व श्रद्धा गिरमे नाबाद २२ यांनी आपले योगदान दिले. महाराष्ट्र संघाने ५० षटकात पाच बाद २७५ अशी भक्कम धावसंख्या उभारली. गुजरात महिला संघाकडून कृष्णा पटेल हिने ७१ धावांत तीन विकेट घेतल्या.
गुजरात महिला संघासमोर विजयासाठी २७६ धावांचे आव्हान होते. मात्र, गुजरात महिला संघ १०९ धावांत सर्वबाद झाला. कृष्णा पटेल हिने सर्वाधिक ४२ धावा काढल्या. तिने सहा चौकार मारले. महाराष्ट्र महिला संघाकडून ईशा पाठारे हिने २८ धावांत चार विकेट घेऊन संघाच्या दणदणीत विजयात मोलाचा वाटा उचलला. ज्ञानेश्वरी पाटील (१-२६), इशिता खळे (१-१८), उत्कर्षा कदम (१-१७), खुशी मुल्ला (१-३) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.