
सोलापूर : भारताच्या ज्युनिअर टेबल टेनिस संघाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जगदीप भिवंडीकर सोलापूरातील ६ खेळाडूंना एक वर्ष तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या शनिवारी व रविवारी सोलापूरात येऊन ते प्रशिक्षण देतील. त्यांच्या वेलफेअर संस्थेमार्फत निवडलेल्या खेळाडूंना प्रशिक्षणानंतर ट्रॉफी व प्रमाणपत्र देणार आहेत.
जगदीप भिवंडीकर यांची कार्यशाळा येथील इंदिरा गांधी स्टेडियमवरील मुळे पव्हेलियन हॉलमध्ये झाली. या कार्यशाळेनंतर त्यांनी राजवर्धन तिवारी, वेदांत खलडे (बार्शी), शिवानी सानप, वेदांकिता पाटील, विनोद मगजी व श्रीकांत असावा (सोलापूर) या ६ खेळाडूंची तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी निवड केली.
या कार्यशाळेत त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शिकावू व प्रौढ खेळाडूंना टेबल टेनिस खेळातील काही टिप्स दिल्या व फिटनेसबद्दलही सांगितले. गेम खेळतानाच्या चुका कसे होतात, ते खेळाडूंच्या लक्षात आणून दिल्या. सराव कसा व कोणत्या पद्धतीने करावा व समोरच्या खेळाडूंची मानसिकता व त्याच्या स्ट्रोकची क्षमता आणि स्पिनकडे लक्ष्यपूर्वक बघून तो ब्लॉक कसा करावा याची माहिती सांगितली. जेव्हा टेन ऑल स्कोर होतो त्यावेळी खेळाडूंची काय मानसिकता होती आणि तो कसे काळजीपूर्वक खेळतो तसेच सुरवातीपासूनच खेळले पाहिजे, त्या टिप्स त्यांनी सर्व खेळाडूंना दिल्या.
सुरुवातीस जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ राजीव प्रधान यांनी त्यांचे स्वागत केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ भास्कर पाटील, बार्शी येथील प्रशिक्षक गणेश स्वामी, जिल्हा संघटनेचे सचिव झेड एम पुणेकर, ऑबरी अलमेडा यांनी परिश्रम घेतले.