
हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर ब्रंट, हरमनप्रीत कौरची धमाकेदार फलंदाजी
मुंबई : हेली मॅथ्यूज (७७) आणि नॅट सायव्हर ब्रंट (७७) यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्स संघाने विक्रमी धावसंख्या रचून गुजरात जायंट्स संघाचा ४७ धावांनी पराभव केला. एलिमिनेटर सामन्यातील या विजयाने मुंबई इंडियन्स संघाने अंतिम फेरी गाठली आहे. आता महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना मुंबई आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात शनिवारी (१५ मार्च) होणार आहे. मुंबईने दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.

एलिमिनेटर सामना जिंकण्यासाठी गुजरात जायंट्स संघासमोर २१४ असे अवघड आव्हान होते. गुजरातच्या डावाची सुरुवात खराब झाली. पॉवर प्लेमध्ये गुजरातची ३ बाद ४३ धावा अशी बिकट स्थिती झाली होती. बेथ मुनी (६), हरलीन देओल (८), कर्णधार अॅशले गार्डनर (८) या आघाडीच्या फलंदाजांना मुंबईने झटपट बाद करुन सामन्यावर आपली पकड अधिक घट्ट केली.
डॅनिएल गिब्सन (३४), फोबी लिचफिल्ड (३१), भारती फुलमाळी (३०) यांनी आक्रमक फटकेबाजी करुन सामन्यात थोडी रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, धावगती कायम ठेवताना सातत्याने फटकेबाजी करावी लागत असल्याने त्यांनी आपल्या विकेट गमावल्या. गिब्सन, हरलीन देओल, काशवी गौतम यांना धावबाद करुन मुंबईने गुजरातचा पराभव निश्चित केला. सिमरन शेख (१७) व तनुजा कंवर (१६) यांनी संघाचा पराभव थोडा लांबवला. गुजरात संघाला १९.१ षटकात १६६ धावांवर रोखत मुंबई संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
मुंबई संघाकडून अमेलिया केर (२-२८), हॅली मॅथ्यूज (२-३१), शबनीम इस्माईल (१-३५), नॅट सायव्हर ब्रंट (१-३१) यांनी प्रभावी गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
विक्रमी धावसंख्या
महिला प्रीमियर लीग एलिमिनेटर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने विक्रमी २१३ धावसंख्या उभारली. मुंबईकडून हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी गुजरातच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने १२ चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी केली आणि मुंबईची धावसंख्या २२० च्या पुढे नेली.
मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यास्तिका भाटिया फक्त १५ धावा करून बाद झाली, पण त्यानंतर हेली मॅथ्यूज आणि नॅट सायव्हर ब्रंट यांनी गोंधळ घातला. दोघांनी मिळून १३३ धावा जोडल्या. एकीकडे, मॅथ्यूजने ५० चेंडूत ७७ धावा केल्या आणि ब्रंटने ४१ चेंडूत ७७ धावा केल्या. या डावात त्यांनी मिळून २० चौकार आणि ५ षटकार मारले. शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरने १२ चेंडूत ३६ धावांची तुफानी खेळी केली. हरमनप्रीत हिने तब्बल चार टोलेजंग षटकार व दोन चौकार ठोकत मैदान दणाणून सोडले.
मुंबई इंडियन्सने आता महिला प्रीमियर लीग इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. यापूर्वी, महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबईचा सर्वोच्च धावसंख्या २०७ धावा होती, जी त्यांनी २०२३ मध्ये गुजरातविरुद्ध केली होती. आता मुंबईने २१३ धावा करून आपला विक्रम सुधारला आहे, हा विक्रम गुजरात संघाविरुद्ध तयार झाला आहे. महिला प्रीमियर लीग इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या यूपी वॉरियर्सच्या नावावर आहे. त्यांनी यंदाच्या हंगामात आरसीबी संघाविरुद्ध खेळताना २२५ धावा केल्या होत्या.