
वेदांत मुसळे, श्रेयस कुदळे, श्लोक चौधरी व हिमांशु व्हनगावडे यांचा समावेश
सोलापूर : सोलापूर चेस अकॅडमीच्या वेदांत मुसळे, श्रेयस कुदळे, श्लोक चौधरी व हिमांशु व्हनगावडे यांनी आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी नोंदवत फिडेच्या क्लासिकल, रॅपिड व ब्लिट्झ रेटिंग प्रकारात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले आहे.
कोल्हापूर येथील खुल्या फिडे मानांकन निवड बुद्धिबळ स्पर्धेत सेंट जोसेफ स्कूलमध्ये शिकत असलेल्या वेदांत मुसळे याने उत्कृष्ट खेळ करत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अद्वय ढेणे यास पराभूत केले. तसेच वरद पाटील, यश टंडन आणि आरुष शिंदे यांच्याशी बरोबरी साधली व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त करण्याचा निकष पूर्ण करत क्लासिकल प्रकारात १५०८ रेटिंग मिळवले.

पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत श्री मराठी मेडियम मध्ये शिकत असलेल्या श्रेयस कुदळेने भालचंद्र बेलोरकर आणि श्लोक कुलकर्णी या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्का देत क्लासिकल प्रकारात १४२६ तर विविध ब्लिट्झ रेटिंग स्पर्धेत चांगली कामगिरी करत १४८१ ब्लिट्झ रेटिंग प्राप्त केले. तसेच श्रेयसने फिडेच्या ऑनलाइन अरेना गेमिंग प्लॅटफॉर्मवर खेळत अरेना कॅंडिडेट हे टायटल देखील प्राप्त केले आहे.

इंडियन मॉडेल स्कूल मध्ये शिकत असलेल्या श्लोक चौधरी याने उत्कृष्ट खेळत पुणे येथे झालेल्या फिडेच्या रॅपिड आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त बुद्धिबळ स्पर्धेत प्रशांत पिंजरे व विक्रांत सुपेकर यांना पराभूत करत चमकदार कामगिरी करत रॅपिड प्रकारात १४५१ रेटिंग मिळविले. तर सेंट जोसेफ स्कूल मध्ये शिकत असलेल्या हिमांशु व्हनगावडे याने देखील आकर्षक कामगिरी करत वैभव क्षीरसागर व स्वयम मार्कंडे यांचा पराभव करत फिडेच्या रॅपिड प्रकारात १४३२ आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त केले.

वेदांत, श्रेयस, श्लोक व हिमांशु यांना आंतरराष्ट्रीय गुनांकन प्राप्त उदय वगरे, वैष्णवी बोंडगे तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सचिव सुमुख गायकवाड, सोलापुर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर अभिनंदन केले.