
तृप्ती लोढेची प्रभावी गोलंदाजी
नागपूर : पुणे येथे झालेल्या बीसीसीआय २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक स्पर्धेतील शेवटच्या गट एफ लीग सामन्यात विदर्भ महिला संघाला बडोद्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. या सामन्यात बडोद्याने विदर्भाचा ३ विकेट्सने पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना मैदानावर झालेल्या तणावपूर्ण कमी धावसंख्येच्या सामन्यात, नाणेफेक जिंकल्यानंतर विदर्भ महिला संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय उलटला. कारण त्यांना ३३.२ षटकांत ६५ धावांवर गारद करण्यात आले. २३ धावांवर नाबाद राहिलेली कर्णधार जान्हवी रंगनाथन वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला टिकून खेळता आले नाही. बडोद्याच्या गोलंदाज नृपा (५-१७) आणि मैत्री (३-७) यांनी आपापसात आठ बळी घेतले.
विदर्भाच्या गोलंदाजांनी मात्र हार मानण्यास नकार दिला आणि तृप्ती लोढे हिने पाच बळी घेत बडोद्याची धावसंख्या ४८/६ अशी केली. तृप्तीने पुन्हा एकदा विकेट घेऊन बडोद्याची ७/५७ अशी अवस्था केली होती. पण त्यांना लक्ष्याचा पाठलाग करण्यापासून रोखू शकले नाही. तृप्तीने २१ धावांत ६ अशी लक्षवेधक कामगिरी केली.
विदर्भाने ५ सामन्यांत १२ गुणांची कमाई केली. बडोदा (१६) आणि आघाडीवर असलेल्या मुंबई (२०) यांच्या मागे विदर्भ संघाचा क्रमांक लागला.