
खेलो इंडिया विंटर गेम्स
पुणे : गुलमर्ग येथे झालेल्या खेलो इंडिया विंटर गेम्स स्पर्धेत सहभागी झालेला पुण्याचा परम पुष्कर सहस्त्रबुद्धे हा सर्वात युवा खेळाडू ठरला. वयाच्या १३व्या वर्षी स्पर्धेत सहभाग घेऊन परम याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
पुण्यातील चिंचवड येथील परम पुष्कर सहस्रबुद्धे हा केवळ १३ वर्षांचा आहे. के ८ स्कूलचा तो विद्यार्थी आहे. परमचे वडील आर्मीमध्ये असल्याने तो त्यांच्या वडिलांसोबत देशाच्या वेगवेगळ्या भागात जात असतो. परम जानेवारी २०२४ पासून म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षापासून औली येथे आणि नंतर गुलमर्ग येथे नॉर्डिक स्कीचे प्रशिक्षण घेत आहे. परम पुष्कर सहस्रबुद्धे याने अलीकडेच महाराष्ट्र संघाकडून खेलो इंडिया विंटर गेम्स २०२५ मध्ये नॉर्डिक क्रॉसकंट्री स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने १० किमी क्रॉसकंट्री आणि १.५ किमी स्प्रिंट अशा दोन स्पर्धांमध्ये संपूर्ण भारतातील सर्व वरिष्ठ खेळाडूंसोबत स्पर्धा केली. परमने रेकॉर्ड वेळेत ही स्पर्धा पूर्ण करून अतिशय चांगली कामगिरी केली. सध्या तो भारतातील नॉर्डिक स्कीइंगसाठी एकमेव ज्युनियर उमेदवार आहे. २०२८ मध्ये नॉर्डिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि हिवाळी युवा ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेण्याचे त्याचे ध्येय आहे. तो महाराष्ट्रातून खेलो इंडिया हिवाळी खेळ २०२५ मध्ये सहभागी होणारा सर्वात तरुण खेळाडू आहे.
या कामगिरीबद्दल महाराष्ट्र स्की अँड स्नोबोर्ड असोसिएशनचे अध्यक्ष अॅड आनंद लाहोटी, एमएसआरएचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव डॉ दयानंद कुमार, सीडीएम मिलिंद दीक्षित यांनी परमचे अभिनंदन केले.