रावेर येथे नाईक महाविद्यालयात खे‌ळाडू, प्रशिक्षकांचा गौरव 

  • By admin
  • March 14, 2025
  • 0
  • 20 Views
Spread the love

जळगाव : रावेर येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात पदक विजेते खेळाडू, प्रशिक्षकांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमंत दादा नाईक हे होते. रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, राज्य राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये विशेष म्हणजे यावर्षी अश्वमेघ स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता खेळाडू तुषार सूर्यवंशी, उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून मोहनदास महाजन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. प्रतीक नाईक, डॉ उमेश पाटील व अर्थशास्त्र विषयामध्ये विद्यापीठात प्रथम आलेली वृषाली पाटील हिचा सत्कार करण्यात आला. तसेच वेटलिफ्टिंग, रग्बी, ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या संघात महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला

या प्रसंगी मार्गदर्शन करताना खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचे स्वप्न समोर ठेवून तसेच परिस्थिती कशीही असली तरी त्यावर मात करून आपले करिअरकडे लक्ष देण्याचे गरज असल्याचे सांगितले. याचे उदाहरण देताना त्यांनी यशस्वी जयस्वाल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू लहाणपणी पाणीपुरी विकून आपले किक्रेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले असे सांगितले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनिल पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयात यशाची परंपरा ही सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात, विद्यापीठ स्तरावर, राष्ट्रीय व राज्यस्तरावर महाविद्यालयाचे नावलौकिक करत आहेत. मुलांच्या बरोबरीने मुली देखील मेहनत करून राष्ट्रीय स्तरावर जात आहे. खेलो इंडिया स्पर्धेत सुद्धा अनेक पदके महाविद्यालयाला प्राप्त होत आहेत. या सगळ्या घडामोडीत संस्थेचा खूप मोलाचा वाटा असल्यामुळे येणाऱ्या काळात हा आलेख अजून उंचावेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील यांनी केली. त्यात त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडताना या शैक्षणिक वर्षात गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने असून खेळाडू विविध स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर खेळायला जात आहेत. कश्मीर ते कन्याकुमारी होणाऱ्या क्रीडा स्पर्धेत खेळाडू महाविद्यालयाचे नाव उज्वल करत आहेत. विद्यापीठाला सातत्यपूर्ण पदक प्राप्त करून देणारे रावेर महाविद्यालय आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष हेमंतदादा नाईक यांनी तायकांदो खेळाळूंसाठी मॅट उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांचे सर्व खेळाडू व जिमखानाच्या वतीने आभार मानले. 

या प्रसंगी मंचावर संस्थेचे सचिव प्रा एम सी कानडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा संदीप धापसे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ एल सी नेमाडे, नॅक समन्वयक डॉ बी जी मुख्यदल, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा सत्यशिल धनले, डॉ एन सोनार, डॉ चिंचोरे, क्रीडा समिती सदस्य प्रा चतुर गाडे, डॉ जी आर ढेंबरे, डॉ सागर महाजन, डॉ गव्हाड, प्रा सागर महाजन, प्रा जोशी, प्रा तेजस दसनुरकर, प्रा डी वाय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नीता जाधव, डॉ स्वाती राजकुंडल यांनी केले. प्रा संदीप धापसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील मेढे, ऋतिक गाढे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *