खेळामुळे करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत 

  • By admin
  • March 14, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

आमदार मोनिका राजळे यांचे प्रतिपादन

शेवगाव : महाराष्ट्र शासनातर्फे सध्या खेळांना दिली जाणारी सुविधा आणि प्रोत्साहन यामुळे खेळाच्या क्षेत्रात करिअर निर्माण होत असून अनेक संधी उपलब्ध होत आहेत, असे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांनी केले. 

’चांगली कामगिरी केल्यास शासकीय सेवेत सामावून घेण्यात येते आणि खेळातून करिअर घडवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे त्या पुढे म्हणाल्या.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि अहमदनगर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, तसेच शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन अहिल्यानगर शेवगाव येथे करण्यात आले.

याप्रसंगी खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव आणि महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ चंद्रजित जाधव, खजिनदार अॅड गोविंद शर्मा, पीएमटी शिक्षण संकुलाचे कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच, नुकत्याच झालेल्या जागतिक खो-खो स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर, प्रियांका इंगळे आणि संघांचे प्रतिनिधित्व करणारे सुयश गरगटे, अनिकेत पोटे, रेश्मा राठोड, अश्विनी शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आमदार मोनिकाताई राजळे यावेळी म्हणाल्या, ‘राज्य सरकारने भाई नेरुरकर खो-खो स्पर्धेच्या आयोजनासाठी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे, जे खेळाच्या क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेवगाव येथे होणाऱ्या राज्य खो-खो स्पर्धेच्या माध्यमातून येथे आणखी उत्कृष्ट खेळाडू तयार होतील.’

यावेळी डॉ चंद्रजीत जाधव म्हणाले की, ‘शेवगाव येथे होत असलेल्या या स्पर्धेची तयारी अवघ्या पंधरा दिवसात केली आहे. चांगले नियोजन केले आहे. या स्पर्धेतून राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करतील. शेवगावने आतापर्यंत खो-खो, कबड्डीचे सरस खेळाडू महाराष्ट्र आणि देशाला दिले आहेत. याचं पद्धतीने भविष्यात चांगले खेळाडू येथून घडतील हे निश्चित आहे.’

भारतात झालेल्या जागतिक खो-खो स्पर्धेत २४ देश सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्ण पदक मिळवले. यामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा मोलाचा वाटा आहे. या खेळाडूंना केंद्र व राज्य सरकार अडीच कोटी रुपये देणार आहे. सध्या राष्ट्रीय स्पर्धेत काही बदल झाले आहेत. त्याचे दूरगामी परिणामी होणार आहेत. याबाबत आम्ही राष्ट्रीयस्तरावर योग्य ते मत नोंदवले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *