
लिजंड्स प्रीमियर लीग क्रिकेट ः संदीप फोके सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लिजंड्स प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेत मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने साई श्रद्धा संघाचा ८२ धावांनी पराभव करत आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात संदीप फोके याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
एमआयटी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत १८ षटकात दोन बाद १८८ अशी भक्कम धावसंख्या उभारत सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना साई श्रद्धा संघाने १३ षटकात आठ बाद १०६ धावा काढल्या. मीनाक्षी इंडस्ट्रीज संघाने ८२ धावांना सामना जिंकला.
या सामन्यात संदीप फोके याने अवघ्या ३९ चेंडूत ७२ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. संदीपने दोन उत्तुंग षटकार व नऊ चौकार मारले. डॉ कार्तिक बाकलीवाल याने ३० चेंडूत ४७ धावांची आक्रमक खेळी केली. कार्तिक याने चार चौकार व दोन सुरेख षटकार मारले. पांडुरंग गाजे याने १९ चेंडूत ३७ धावा फटकावल्या. त्याने तीन टोलेजंग षटकार व दोन चौकार मारले. गोलंदाजीत राजू परचाके याने १८ धावांत तीन विकेट घेतल्या. रमेश साळुंके याने १३ धावांत दोन गडी बाद केले. रणजित याने ३४ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः मीनाक्षी इंडस्ट्रीज संघ ः १८ षटकात दोन बाद १८८ (डॉ सुनील काळे २४, डॉ कार्तिक बाकलीवाल ४७, संदीप फोके नाबाद ७२, पांडुरंग गाजे नाबाद ३७, अमित पाठक १-३३, संतोष साह १-३२) विजयी विरुद्ध साई श्रद्धा संघ ः १३ षटकात आठ बाद १०६ (अमित पाठक २८, फुझैल सिद्दिकी ५, सुनील पल्लोड ९, मनोज चोबे ११, आकाश अभंग नाबाद ३४, राजू परचाके ३-१८, रणजित २-३४, रमेश साळुंके २-१३, पांडुरंग गाजे १-१७). सामनावीर ः संदीप फोके.