
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने व आरसीबीसी आणि अमनोरा स्पोर्टस क्लब (द फर्न) यांच्या सहकार्याने आयोजित पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत कमल चावला याने विजेतेपद पटकावले.
अंतिम लढतीत जागतिक सिक्स रेड स्नूकर स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या कमल चावला याने लक्ष्मण रावत याचा ५-४ (२४-९१ (७४), ४०-९३ (६९), ७१-०४, ५६-३९, ७७-१९, ६७ (६६)-०१, १९-७२ (६१), ००-९३ (९३), ८० (६८)-२१ असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना, आरसीबीसी आणि अमनोरा स्पोर्टस क्लब (द फर्न) या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल ३ तास ३० मिनिटे झालेल्या उत्कंठावर्धक अंतिम सामन्यात लक्ष्मण याने सुरेख सुरुवात करत पहिल्या दोन फ्रेम कमल विरुद्ध ९१ (७४)-२४, ९३ (६९)-४० अशा जिंकून २-० अशी आघाडी घेतली. यामध्ये त्याने पहिल्या व दुसऱ्या फ्रेममध्ये अनुक्रमे ७४ व ६९ गुणांचा ब्रेक नोंदवला. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या कमल याने आपल्या अनुभव व कौशल्याचा सुरेख संगम साधत लक्ष्मण विरुद्ध पुढील चारही फ्रेम ७१-०४ ५६-३९, ७७-१९, ६७ (६६)-०१ अशा जिंकून ४-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर लक्ष्मण याने सातवी व आठवी फ्रेम ७२ (६१)-१९, ९३ (९३)-०० अशा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. निर्णायक व अंतिम फ्रेम मध्ये लक्ष्मणने २०-०० अशी आघाडी मिळवली. पण मोक्याच्या क्षणी मिळालेल्या संधीचा फायदा घेत सुरेख पाँटिंग करत कमलने ६८ गुणांचा ब्रेक नोंदवला व ही फ्रेम ८० (६८)-२१ अशी जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
याआधीच्या उपांत्य फेरीत कमल चावला याने शिवम अरोराचा ५-१ असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. विशेष म्हणजे कमलने आपल्या खेळीत पहिल्या फ्रेममध्ये १३९ गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदवत लक्षवेधी कामगिरी केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत लक्ष्मण रावत याने दिग्विजय कडीयन याचा ५-४ असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला मोतीलाल ओसवाल करंडक व ८५ हजार रुपये, तर उपविजेत्या खेळाडूला करंडक व ४५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत हायेस्ट ब्रेक नोंदविणाऱ्या कमल चावला (१३९ गुण) याला करंडक व ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. याशिवाय उपांत्य फेरीतील खेळाडूंना करंडक व प्रत्येकी २० हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोतीलाल ओसवाल प्रायव्हेट वेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शंकर, आर शंकर आणि मनिषा कन्स्ट्रक्शनचे संचालक राजन खिंवसरा,आरसीबीसीचे किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अरुण बर्वे व सलील देशपांडे, आरसीबीसीचे ऋषी रामय्या, समर खंडेलवाल, अभिजीत रानडे, निशाद चौघुले आदी मान्यवर उपस्थित होते.