
मुंबई ः अहिल्यानगर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र कप राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत मुंबई संघाने १८ पदकांची कमाई केली.
स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. मुंबई शहर संघाने प्रशिक्षक उमेश गजानन मुरकर आणि विघ्नेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ६ सुवर्ण, ६ रौप्य आणि ६ कांस्य पदकांसह एकूण १८ पदकांची घवघवीत कमाई केली.
मुंबईच्या खेळाडूंनी या स्पर्धेत अतिशय चुरशीच्या लढती देत आपल्या खेळाची छाप पाडली. विन्स पाटील व रियांश पाटवर्धन यांनी प्रत्येकी दोन सुवर्णपदक पटकावत संघाच्या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रिशम पाटवर्धन, प्रद्नेश पाटवर्धन यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पटकावली. निधी विश्वकर्मा, सान्वी कारंडे, सनिधी कारंडे, माही पायेलकर, शिद्दत गुप्ता, राजीव राजेश, सिद्धेश आगवाने आणि नंदराज कराळे यांनी रौप्य व कांस्य पदकांची कमाई करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय प्रियांश नंदी आणि हितांशू कुडे यांनीही उल्लेखनीय खेळ केला.
गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांनी या खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि प्रशिक्षणाची महत्वपूर्ण मदत केली. मुंबईच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.