पाकिस्तान संघाची खराब कामगिरी कायम

  • By admin
  • March 16, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

न्यूझीलंड संघाचा नऊ विकेट राखून दणदणीत विजय

क्राइस्टचर्च ः चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील खराब कामगिरीनंतरही पाकिस्तान संघाच्या कामगिरीत कोणतीही खास सुधारणा झालेली नाही. न्यूझीलंड दौऱ्यात पहिल्या टी २० सामन्यात पाकिस्तान संघाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तान संघाला अवघी ९१ धावसंख्या उभारता आली. यजमान न्यूझीलंड संघाने १०.१ षटकात एक बाद ९२ धावा फटकावत नऊ विकेटने सामना जिंकला.

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला सामना रविवारी क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल येथे खेळवण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानी संघाला न्यूझीलंडविरुद्ध कठीण आव्हानाचा सामना करावा लागला आणि त्यांचा डाव फक्त ९१ धावांवर संपला.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि संपूर्ण संघ १८.४ षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतला. हा पाकिस्तानचा टी २० इतिहासातील पाचवा सर्वात कमी आणि न्यूझीलंडमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.

पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करली
न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाला सुरुवातीपासूनच धक्के सहन करावे लागले. दोन्ही सलामीवीर खाते न उघडता पॅव्हेलियन मध्ये परतले. मोहम्मद हरिस आणि हसन नवाज बाद झाल्यानंतर विकेट सतत पडत राहिल्या. पाकिस्तानची टॉप ऑर्डर लवकर बाद झाली आणि मधल्या फळीलाही डाव सांभाळण्यात अपयश आले. काही पाकिस्तानी फलंदाजांनी धावा काढण्याचा प्रयत्न केला, तरी न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर त्यांना काहीही करता आले नाही. संपूर्ण संघ ९१ धावांच्या कमी धावसंख्येत कोसळला.

संघाकडून खुसदिल शाहने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर कर्णधार सलमान आगाने १८ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून जेकब डफीने शानदार गोलंदाजी केली आणि चार विकेट्स घेतल्या. त्याच वेळी, काइल जेमिसनने तीन आणि लेग स्पिनर ईश सोधीने दोन विकेट घेतल्या.

न्यूझीलंडविरुद्ध तिसरी सर्वात कमी धावसंख्या
न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा हा तिसरा सर्वात कमी स्कोअर आहे. क्राइस्टचर्च मैदानावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली आणि संघ १८.४ षटकांत फक्त ९१ धावांवर ऑलआउट झाला. यापूर्वी २०१६ मध्ये वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या टी २० सामन्यात पाकिस्तानने फक्त १०१ धावा केल्या होत्या. तर, २०१८ मध्ये वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या टी २० मध्ये पाकिस्तान संघाला फक्त १०५ धावा करता आल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानची फलंदाजी पुन्हा एकदा कमकुवत ठरली आणि त्यांनी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला.

न्यूझीलंड संघाला विजयासाठी फक्त ९२ धावांची गरज होती. न्यूझीलंड संघाने १०.१ षटकात एक बाद ९१ धावा फटकावत शानदार विजय नोंदवला. टिम सेफर्ट (४४) व फिन अॅलन (नाबाद २९) यांनी आक्रमक सुरुवात केली व ५.५ षटकात ५३ धावा फटकावल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाचा विजय अधिक सुकर बनला. टिम रॉबिन्सन याने नाबाद १८ धावांचे योगदान दिले. एकमेव विकेट अबरार अहमद याने १५ धावा देत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *