
नवी दिल्ली ः ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी निराशाजनक झाली. आता चार वर्षांनी मी पुन्हा ऑस्ट्रेलियाचा दौरा करेन की नाही हे मला माहित नाही. त्यामुळे जे काही झाले ते मी स्वीकारतो असे सांगत विराट कोहली याने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा व्यक्त केली. विराटच्या या वक्तव्याने कोहली पुन्हा एकदा टी २० क्रिकेट सामने खेळण्याची शक्यता वाढली आहे.
विराट कोहली म्हणाला की, जेव्हा तुम्ही बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा लोक तुमच्याकडून खूप अपेक्षा करू लागतात. जेव्हा तुमचा परफॉर्मन्स वाईट असतो तेव्हा चाहत्यांना तुमच्यापेक्षाही वाईट वाटते.
दबावामुळे खराब खेळ
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीला काही खास कामगिरी करता आली नाही. २०२४ मध्ये त्याने १० कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये तो फक्त एक शतक आणि एक अर्धशतक झळकावू शकला. दबावामुळे त्याच्या खेळावर परिणाम झाला हे कोहलीने मान्य केले. कोहली म्हणाला, मी बाह्य गोष्टींकडे अधिक लक्ष देऊ लागलो. मला वाटायचं की फक्त २-३ दिवस उरले आहेत, मला परफॉर्म करायचा आहे. या विचाराने माझ्यावर अधिक दबाव आला आणि माझा खेळ खराब होऊ लागला.
पहिल्या कसोटीत शतक केल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या, परंतु तो पुढे धावा करू शकला नाही, असेही त्याने सांगितले. त्याने कोणताही घाईघाईने निर्णय घेतला नाही आणि कुटुंबासोबत वेळ घालवून परिस्थिती शांत केली. त्याने विचार केला, जे झालं ते सोडून दे. मला आत्ता काहीही ट्विट करण्याची गरज नाहीये. आता आपल्याला भविष्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक
१२८ वर्षांनंतर २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे. शेवटचा क्रिकेट सामना १९०० मध्ये ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात खेळला गेला होता. ज्यामध्ये ब्रिटनने फ्रान्सचा १५८ धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार आहे. आता माजी भारतीय कर्णधार विराट कोहली याने यावर भाष्य केले आहे. आरसीबी इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये बोलताना कोहली म्हणाला की, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन हा एक आनंददायी अनुभव असेल.
त्याच वेळी, जेव्हा किंग कोहलीला विचारण्यात आले की तो निवृत्तीनंतर टी २० क्रिकेटमध्ये परतणार का? यावर त्याने गमतीने उत्तर दिले आणि म्हणाला, ‘नाही!’ ऑलिंपिकसाठी? कदाचित? जर आपण सुवर्णपदकासाठी खेळत असू तर मी कदाचित एका सामन्यासाठी परत येईन. पदक जिंकून घरी परत ये. हा खूप चांगला मुद्दा आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन बनणे ही एक अद्भुत भावना असेल.