
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः ऋषिकेश नायर सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मेटलमन संघाने जॉन्सन अँड जॉन्सन संघावर तीन विकेट राखून विजय नोंदवला. या लढतीत ऋषिकेश नायर याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर प्रकाशझोतात हा सामना झाला. जॉन्सन अँड जॉन्सन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, हा निर्णय जॉन्सन संघाला महागात पडला. जॉन्सन संघ २० षटकात सात बाद ७८ असे माफक लक्ष्य उभे करू शकला. या धावसंख्येचा पाठलाग करताना मेटलमन संघाने १३.१ षटकात सात बाद ८० धावा फटकावत तीन विकेटने सामना जिंकला. कमी धावसंख्या असताना जॉन्सन संघाने मेटलमन संघाला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले.

या सामन्यात ऋषिकेश नायर याने २४ चेंडूत २८ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार मारले. राघव नाईक याने २९ चेंडूत २४ धावा काढल्या. त्याने दोन चौकार मारले. दीपक खानविलकर याने १६ धावांचे योगदान देताना एक चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत ध्रुव याने पाच धावांत दोन गडी बाद केले. पांडुरंग रोडगे याने १६ धावांत दोन विकेट घेतल्या. दीपक खानविलकर याने २८ धावांत दोन गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली.
संक्षिप्त धावफलक ः जॉन्सन अँड जॉन्सन संघ ः २० षटकात सात बाद ७८ (राघव नाईक २४, हेमंत मीठावाला ७, दीपक खानविलकर नाबाद १६, अनिरुद्ध पुजारी ५, इतर १९, ध्रुव २-५, जगदीश जाधव १-३, सोमीनाथ कुबेर १-१७, ऋषिकेश नायर १-१५) पराभूत विरुद्ध मेटलमन संघ ः १३.१ षटकात सात बाद ८० (अनिकेत काळे ९, ऋषिकेश नायर नाबाद २८, अनिल यादव ६, जगदीश जाधव १०, इतर १८, पांडुरंग रोडगे २-१६, दीपक खानविलकर २-२८, अनिरुद्ध पुजारी १-१२, प्रवीण क्षीरसागर १-१६, प्रशांत राव १-६). सामनावीर ः ऋषिकेश नायर.