
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः आसिफ खान सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शहर पोलिस ब संघाने महावितरण अ संघावर सहा विकेट राखून मोठा विजय नोंदवला. या सामन्यात आसिफ खान याने सामनावीर किताब पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. महावितरण अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली व १८ षटकात सर्वबाद ११४ धावा काढल्या. शहर पोलिस ब संघाने १३.३ षटकात चार बाद ११६ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला.
या सामन्यात आसिफ खान याने २९ चेंडूत ५१ धावांची धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली. आसिफने नऊ चौकार व एक षटकार मारला. स्वप्नील चव्हाण याने १६ चेंडूत आक्रमक २७ धावा फटकावल्या. त्याने तीन चौकार मारले. पांडुरंग वाघमोडे याने २० चेंडूत २४ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने पाच चौकार मारले. गोलंदाजीत आसिफ शेख याने १८ धावांत तीन गडी बाद करत आपला ठसा उमटवला. आसिफ खान याने १८ धावांत तीन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. पांडुरंग धांडे याने २६ धावांत दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक ः महावितरण अ संघ ः १८ षटकात सर्वबाद ११४ (पांडुरंग धांडे १४, राहुल शर्मा ७, स्वप्नील चव्हाण २७, राम राठोड १३, प्रदीप चव्हाण १०, अब्दुल अतिक खान ६, कैलास शेळके ८, शशी सपकाळ नाबाद १०, इतर १९, आसिफ शेख ३-१८, आसिफ खान ३-१८, सलमान अहमद १-१७, मोहम्मद अमान १-१२, रिझवान अहमद १-१२) पराभूत विरुद्ध शहर पोलिस ब संघ ः १३.३ षटकात चार बाद ११६ (सलमान अहमद ६, आसिफ खान ५१, पांडुरंग वाघमोडे २४, बाबासाहेब नाबाद ९, रिझवान अहमद नाबाद १३, पांडुरंग धांडे २-२६, कैलास शेळके १-२२, राम राठोड १-२०). सामनावीर ः आसिफ खान.