
ठाणे ः महानगरपालिका क्षेत्रासोबत ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांनी सांगितले.
ठाणे मनपा क्षेत्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना पहिली कार्यकारणी सभा नुकतीच ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे कार्यालय दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे झाली. ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे मनपा क्षेत्र क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रणजीत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.

या बैठकीमध्ये ठाणे मनपा कार्यकारणीतर्फे ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघावर निवडलेले नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद वाघमोडे तसेच कार्यालयीन सचिव राजेंद्र पवार, संघटक पांडुरंग ठोंबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा महासंघाचे अध्यक्ष प्रमोद वाघमोडे मार्गदर्शन करताना, येणाऱ्या वर्षभरातील महासंघाच्या कार्याची माहिती उपस्थित क्रीडा शिक्षकांना दिली.
क्रीडा शिक्षकांना संघटित करुन विकास
ठाणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता ८ तालुके व ६ महानगरपालिका असून शालेय क्रीडा स्पर्धांसाठी, तालुक्यांना ग्रामीण स्पर्धा व महानगरपालिकांना जिल्हा स्पर्धांचा दर्जा आहे. त्यामुळे खेळाडू हा केंद्रबिंदू मानून, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच महानगरपालिका क्रीडा अधिकारी यांना शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनात सहकार्य करणे. तसेच क्रीडा शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करणे. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये अनुदानित व विनाअनुदानित खेळ घेतले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व क्रीडा प्रकारांच्या जिल्हा स्पर्धा आयोजनात सुसूत्रता आणण्यासाठी ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ प्राधान्याने लक्ष देणार आहे. या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके व महानगरपालिका क्षेत्रांतील क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षकांना संघटित करुन क्रीडा विकास करणे हे ध्येय आहे, असे प्रमोद वाघमोडे यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे महासंघाचे क्रीडा विकासाचे उद्दीष्ट साध्य करताना काही मुद्दे अधोरेखित केले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ येणाऱ्या काळात प्रामुख्याने पुढील विषयावर पुन्हा एकदा नव्या जोमाने कार्य करण्याचा दृढ संकल्प करत आहे.
विविध मुद्यांवर काम करण्याचे ध्येय
१. जास्तीत जास्त क्रीडा शिक्षक बांधवांना एकत्र करणे व त्यांचे मनोबल वाढवणे, २. क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाबद्दल शिक्षकांचे मनोबल व सक्रियता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कार्यशाळांचे आयोजन नियोजन करणे, ३. पवित्र पोर्टल बाबत विचारविनिमय करून सदर बाबतची दिशा निश्चित करणे, ४. पहिली ते आठवीसाठी शाळांमध्ये कायमस्वरूपी क्रीडा शिक्षक नियुक्तीसाठी पुन्हा प्रयत्न करणे, ५. आजच्या युगातील विद्यार्थी व त्यांचे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या नवनवीन सामाजिक माध्यमांचे आकर्षण व अन्य समस्या शिक्षकांनी कशा हाताळल्या पाहिजे यासाठी मार्गदर्शन, शिबिरे व चर्चासत्रांचे आयोजन करण्यासाठी ऑफलाइन व ऑनलाईन बैठक घेणे व दिशा ठरवणे, ६. कौतुकास्पद कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी उभे राहणे व त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करणे, त्या संदर्भात वार्षिक पुरस्काराबाबत तालुका जिल्हा राज्य असे स्तर ठरवणे, ७. प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक महानगरपालिकेतील राष्ट्रीय खेळाडूंचा तसेच राज्य पातळी खेळाडूंचा तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करणे प्रोत्साहन देणे, ८. विविध खेळांच्या एकविध संघटनांच्या तसेच, शिक्षणाधिकारी व जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या क्रीडा शिक्षकांना नवनवीन खेळाची माहिती देणे व प्रशिक्षण नियोजन करणे.
ठाणे जिल्ह्याप्रमाणे मनपा क्षेत्रात ही महिला क्रीडा शिक्षकांचे स्वतंत्र युनिट उभे करावे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिका संघटनेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरही महानगरपालिका क्षेत्रातील व सर्व तालुक्यांतील क्रीडा शिक्षकांनी एकत्र येऊन संघटनेची बांधणी करावी व एकजुटीने कार्यास सुरुवात करावी असे आवाहन प्रमोद वाघमोडे यांनी केले. या बैठकीस ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची ठाणे जिल्हा संलग्न ठाणे महानगरपालिका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रणजीत शिंदे, सचिव डॉ एकनाथ पवळे, कोषाध्यक्ष मोहम्मद जुबेर मोहम्मद आसिफ बक्षी, कार्याध्यक्ष प्रमोद वाघमोडे, उपाध्यक्ष पांडुरंग ठोंबरे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सहसचिव नामदेव पाटील, संघटक प्रतिमा महाडिक तसेच सदस्य रोहिणी डोंबे, विशाखा आर्डेकर, निलेश वळवी, मोहसिन शेख, मयुरेश शिर्के आदी उपस्थित होते.