
पुणे ः इंडियन माऊंटेनियरिंग फाउंडेशन हे पर्वतारोहण आणि संबंधित खेळांसाठीची भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे. आयएमएफ भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चढाई आणि पर्वतारोहणाला समर्थन, प्रोत्साहन आणि नियमित करते. याच संस्थेद्वारे भारतातील विविध राज्यांमध्ये आयएमएफ फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत आहे. यापैकीच एक फिल्म फेस्टिवल रविवारी पुण्यामध्ये पार पडला.
भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था असलेल्या गिरिप्रेमी संस्थेने पुण्यातील या फिल्म फेस्टिवलचे आयोजन केले होते. पुण्यातील सप महाविद्यालय टिळक रोड येथील लेडी रमाबाई हॉल येथे हा फिल्म शो पार पडला.
या फिल्म फेस्टिव्हल मध्ये भारतीय चित्रपट निर्मात्यांनी तयार केलेल्या साहसी चित्रपटांचे प्रदर्शन झाले, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी भारताच्या विविध आणि सुंदर निसर्गाच्या ठिकाणांवर केलेली अद्वितीय चित्रफीत दाखवल्या गेल्या. ‘एक सल्यूट’, ‘क्रेम उमला डॉ – द डिसेंट इंटू डार्कनेस’, ‘द असेंट ऑफ माउंट मेरू’, ‘डर्टन गेट्स’, ‘लाइफ अपहिल’, ‘गंगा गर्ल्स’ आणि ‘ए हिमालयन गॅम्बल’ या सात वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील चित्रफीत दाखवल्या गेल्या.
अशा या वेगवगेळ्या शैलीतील फिल्म शो पाहण्यासाठी साहस प्रेमींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत, ३५०हुन अधिक साहसप्रेमींनी या फिल्म शोला उपस्थिती लावली. सदर कार्यक्रमाला गिरीप्रेमींच्या संस्थापक अध्यक्ष उषःप्रभा पागे, ‘तेनजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त उमेश झिरपे, अष्टहजारी शिखरवीर कृष्णा ढोकले, भूषण हर्षे, जितेंद्र गवारे, आशिष माने, डॉ सुमित मांदळे, विवेक शिवदे, याच सोबत गिरिप्रेमी संस्थेचे सर्व गिर्यारोहक सदस्य उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिर्यारोहक मनोज कुलकर्णी यांनी पार पाडले.