
अमन मोखाडे, शिवम देशमुखची दमदार अर्धशतके
नागपूर ः अमन मोखाडे (नाबाद ७२) आणि शिवम देशमुख (६३) यांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर मिनिस्ट्रियल सर्व्हिसेस स्पोर्ट्स क्लब संघाने गुज्डर लीग ‘अ’ डिव्हिजन वन-डे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रुबी कोल्ट्सवर ७ विकेटने सहज विजय मिळवला आणि विजेतेपद पटकावले.
रुबी कोल्ट्सच्या २१६ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना शिवम ६३ आणि वेदांत जाजू ३४ धावा यांनी एमएसएससीला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीवीरांनी ९.२ षटकांत ५४ धावा जोडल्या. शिवम आणि अनिकेत पांडे (२२) यांनी दुसऱ्या विकेटसाठी आणखी ५४ धावा जोडल्या आणि त्यानंतर अमन मोखाडे याने नाबाद ७२ धावांची धमाकेदार खेळी केली. कर्णधार मंदार महाले याने नाबाद २२ धावांचे योगदान देत फक्त ३४.३ षटकांत संघाला विजय मिळवून दिला.
गेल्या काही आठवड्यांतील एमएसएससी संघाने ही दुसरी ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी गुज्डर लीग २ दिवसीय करंडक जिंकला होता.
तत्पूर्वी, रुबी कोल्ट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांनी त्यांचे दोन्ही सलामीवीर नचिकेत भुते यांच्याकडून ११ धावांत गमावले आणि प्रथम चावला (६५) आणि रोहित बिंकर (२६) यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी ७९ धावांच्या भागीदारीतून ते सावरले तरी, त्यांच्या विकेट ठराविक अंतराने पडत राहिल्या. परंतु वरुण बिष्टच्या जलदगती ६८ धावांमुळे त्यांना २०० धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. साहिल शेख (३-२९), भुते (२-३६) आणि महाले (२-३१) यांनी विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक ः रुबी कोल्ट्स ः ४६.१ षटकांत सर्वबाद २१६ (प्रथम चावला ५५, वरुण बिश्त ६८, रोहित बिनकर २६, सचिन कटारिया २७, साहिल शेख ३-२९, नचिकेत भुते २-३६, मंदार महाले २-३१) पराभूत विरुद्ध मिनिस्ट्रियल सर्व्हिसेस स्पोर्ट्स क्लब ः ३४.३ षटकांत तीना बाद २१८ (शिवम देशमुख ६३, वेदांत जाजू ३४, अनिकेत पांडे २२, अमन मोखाडे नाबाद ७२, मंदार महाले नाबाद २२).