
नवी दिल्ली ः पाकिस्तान क्रिकेटमधील समस्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाची कामगिरी खूपच खराब होती आणि आता असे वृत्त समोर आले आहे की या आयसीसी स्पर्धेचे आयोजन करणे पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी महागडे ठरले आहे. कारण त्यांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. टेलिग्राफ इंडियाच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनात पीसीबीला ८५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७३७ कोटी रुपये) नुकसान झाले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले होते. परंतु भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. अंतिम सामन्यासह भारताचे सर्व सामने दुबईमध्ये झाले. पाकिस्तान संघाची कामगिरीही चांगली नव्हती आणि त्यांचा प्रवास गट टप्प्यात संपला. पाकिस्तानने या स्पर्धेत विजेतेपदाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता.
घरच्या मैदानावर फक्त एकच सामना खेळला
पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले होते. या गटात भारत, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश होता. पाकिस्तानला प्रथम न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर पुढच्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले. बांगलादेश संघाविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे पाकिस्तान संघ स्पर्धेत एकही सामना जिंकू शकला नाही. मनोरंजक गोष्ट म्हणजे, यजमान असूनही पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानावर फक्त एकच सामना खेळता आला कारण त्यांचा भारतीय संघाविरुद्धचा सामना दुबईमध्ये झाला होता.
अहवालांनुसार पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रावळपिंडी, लाहोर आणि कराची येथील स्टेडियमच्या नूतनीकरणावर सुमारे ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली. हे त्यांच्या सुरुवातीच्या बजेटपेक्षा ५० टक्के जास्त आहे. त्यानंतर, पीसीबीने स्पर्धेच्या तयारीसाठी ४० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३४७ कोटी रुपये) खर्च केले. परंतु त्या बदल्यात त्यांना यजमान शुल्क म्हणून फक्त सहा दशलक्ष डॉलर्स (सुमारे ५२ कोटी रुपये) मिळाले. तिकीट विक्री आणि प्रायोजकत्वातून मिळणारे उत्पन्न खूपच कमी होते. या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की यामुळे पाकिस्तानला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.