
विद्यमान अध्यक्ष अजय सिंग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाच्या शर्यतीत
नवी दिल्ली ः बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे विद्यमान अध्यक्ष अजय सिंग हे सलग तिसऱ्यांदा अध्यक्ष पदावर राहण्याची शक्यता आहे. त्यांनी या पदकासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गुरुग्राम येथे येत्या २८ मार्च रोजी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष अजय सिंग यांनी तिसऱयांदा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत अजय सिंग यांना सरचिटणीस हेमंत कलिता आणि उपाध्यक्ष राजेश भंडारी यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
उत्तराखंड बॉक्सिंग असोसिएशनने अजय सिंग यांचे नाव सुचवले होते. अध्यक्षपदासाठी ते आसाम बॉक्सिंग असोसिएशनच्या सचिव हेमंत कलिता आणि हिमाचल प्रदेश बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेश भंडारी यांच्याविरुद्ध लढतील. भंडारी यांनी उत्तर विभागाच्या उपाध्यक्षपदासाठीही अर्ज केला आहे, सध्या ते या पदावर आहेत. केरळ राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव डी चंद्रलाल हे अध्यक्षपदासाठी चौथे दावेदार आहेत.
अनुराग ठाकूर निवडणूक लढवू शकणार नाही
माजी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे देखील अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती आणि हिमाचल प्रदेश बॉक्सिंग असोसिएशनने त्यांचे नाव प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. पण अजय सिंग यांनी अंतिम केलेल्या मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते. कलिता यांनी त्यांचा वेगळ्या यादीत समावेश केला असला तरी, निवडणूक अधिकारी आर के गौबा यांनी स्थापित निकषांनुसार बीएफआय प्रमुखांनी दिलेल्या यादीला मान्यता दिली.
सचिव पदासाठी अनेक उमेदवार आहेत.
सचिवपदासाठी अनेक उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात उत्तर प्रदेशचे प्रमोद कुमार, कर्नाटकचे सतीश एन, ओडिशाचे अनिल कुमार बोहिदार आणि निवर्तमान कोषाध्यक्ष दिग्विजय सिंह (मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. दिग्विजय यांनी कोषाध्यक्षपदासाठीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय आठ प्रादेशिक उपाध्यक्ष आणि तेवढ्याच संख्येतील प्रादेशिक सह सचिवांची निवड करायची आहे. वैध नामांकन आणि माघारीची यादी १९ मार्च रोजी जाहीर केली जाणार आहे.