
जळगाव ः गांधी रिसर्च फाऊंडेशन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या दोन संस्थांनी सामंजस्य करारांतर्गत आयोजित केलेल्या दोन दिवसीय गांधी विचार दर्शन कार्यशाळेचे नुकतेच गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागासह अन्य विभागाच्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ३३ विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता. कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी गांधी तीर्थ म्युझियमला तसेच अॅग्री पार्क व फूड पार्कला भेट दिली. गांधी विषयावरील विविध सत्रासह पीस वॉक, पीस गेम्स कार्यशाळेत घेण्यात आले.
पहिल्या दिवशी उद्घाटन सत्रात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई यांनी आपण येथे का आलो आहोत, येथून गेल्यावर आपण काय करणार आहोत व आपल्या जीवनाचा उद्देश काय याचा विचार करावा असे आवाहन केले. तसेच गांधी अभ्यासक बरुण मित्रा यांनी येथील गोष्टींचा अनुभव घ्यावा असे आवाहन केले. सर्व विद्यार्थ्यांचा व साधन व्यक्तींचा परिचय करून घेण्यात आला. त्यानंतर म्युझियम व अन्य विविध विभागांना विद्यार्थ्यांनी भेट दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी गिरीश कुळकर्णी यांनी व्यक्तिमत्त्व विकास व यशाचे नियम सांगितले. अध्यापक दीपक मिश्रा यांनी महात्मा गांधींनी सांगितलेली सात सामाजिक पातके यावर विस्तृत मार्गदर्शन केले. बरुण मित्रा यांनी गांधी जीवनाचा आजच्या काळाशी असलेली सुसंगतता स्पष्ट केली. भोजनोत्तर सत्रात अश्विन झाला यांनी सामाजिक कृतज्ञता उदाहरणाद्वारे समजावून सांगितली. डॉ. गीता धर्मपाल यांनी जीवनासाठी शिक्षण या विषयावर संवाद साधला. त्यानंतर पीस गेम्सद्वारे प्रबोधन करण्यात आले.
समारोप सत्रात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या भावना व्यक्त केल्यात. विशेषतः येथील शांत व निसर्गरम्य वातावरण, काम करणाऱ्या व्यक्तींची शिस्त, चरखा या गोष्टी शिकावयास मिळाल्यात. अनेकांनी समाज माध्यमातून आमच्यापर्यंत महात्मा गांधी बद्दलची चुकीची माहिती पोहोचली व तेवढीच माहिती आम्हाला होती. येथील म्युझियम पाहिल्यानंतर व कार्यशाळेतील विविध सत्रे ऐकल्यानंतर महात्मा गांधी व त्यांचे जीवनकार्य कळले, असे सांगितले. तसेच ही कार्यशाळा किमान ३ दिवसांची असावी असे म्हणत अलीकडच्या सामाजिक आव्हानावरील सत्रांवर भर देण्यात यावा अशी सूचना केली.