
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक
नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड हिवाळी खेळांमध्ये ३३ पदके जिंकणाऱ्या विशेष खेळाडूंच्या संघाची भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

पंतप्रधानांनी सोशल मीडियावर विशेष खेळाडूंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आणि त्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. ट्यूरिन (इटली) येथे झालेल्या या खेळांमध्ये भारतीय संघाने आठ सुवर्ण, १८ रौप्य आणि सात कांस्य पदके जिंकली. स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताने ३० विशेष खेळाडू आणि १९ सदस्यीय सपोर्ट स्टाफचा संघ पाठवला होता. विशेष खेळाडूंनी सहा खेळांमध्ये पदके जिंकली आहेत. त्यात अल्पाइन स्कीइंग, ट्रॅक स्पीड स्केटिंग आणि क्रॉस-कंट्री स्नो बोर्डिंग, फ्लोरबॉल, स्नो शूइंग, शॉर्ट स्कीइंग या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
‘देशाला गौरव मिळवून दिला’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ट्यूरिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेत देशाला गौरव मिळवून देणाऱ्या आपल्या खेळाडूंचा मला खूप अभिमान आहे. आमचा अविश्वसनीय संघ ३३ पदके घेऊन घरी परतला. मी संसदेत या संघाला भेटलो आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले. क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या अध्यक्षा मल्लिका नड्डा हे देखील संघासोबत उपस्थित होते.
क्रीडा मंत्रालयाने पदक विजेत्यांच्या रोख पुरस्कारांमध्ये वाढ करण्याची घोषणाही केली. सुवर्णपदक विजेत्याला २० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला १४ लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला ८ लाख रुपये रोख बक्षीस मिळेल. तत्पूर्वी, मल्लिका नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारतीय पथकाचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी क्रीडा मंत्री मांडवीय आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील उपस्थित होते.