
चिपळूण : क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आणि प्रतिभावंत खेळाडू सर्वस्तरावर निर्माण होण्यासाठी पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ हे दोन घटक आवश्यक आहेत. त्यामुळे तळागाळातील खेळाडूंच्या दारात आधुनिक क्रीडा सोयीसुविधा पोहचवण्याची सर्वाधिक गरज आहे. हे ओळखून डेरवण स्पोर्ट्स अकॅडमीने १२ वर्षांपूर्वीच क्रीडा क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे, असे मत अजित गाळवणकर यांनी व्यक्त केले.
सर्व खेळातील इच्छुक खेळाडूंनी स्पर्धेत भाग घ्यावा आणि आपली प्रगती करून घ्यावी, जास्तीत जास्त खेळाडू निर्माण व्हावेत हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. या क्रीडा स्पर्धेचे आयोजन ग्रामीण भागात केल्याने आपल्या गावात घरच्या मैदानातच खेळाडूंना आरोग्यदायी शैलीकडे वळण्याची प्रेरणा या स्पर्धेमुळे मिळते. कोकणासह सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, मुंबईपासून मराठवाडा, विदर्भातील खेळाडू देखील या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतात. या स्पर्धेच्या निमित्ताने स्पोर्ट्स सायन्स म्हणजेच खेळाडूला खेळताना उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्यांवर उत्कृष्ट मार्गदर्शन करून या खेळासाठी चांगला शारीरिक विकास करून तो या खेळासाठी अधिक सक्षम कसा बनेल याचेदेखील पाठ या मैदानावर गिरवले जात आहेत याकडे अजित गाळवणकर यांनी लक्ष वेधले.
डेरवण युथ गेम्सच्या स्पर्धेबरोबर वर्षभरामध्ये सर्व खेळातील जिल्हास्तरीय, राष्ट्रीय अनेक स्पर्धांचे सर्व खेळातील (जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस, बॅटमिंटन, फुटबॅाल, अॅथलेटिक्स) आदी खेळांचे आयोजन केले जाते. त्यामुळे ग्रामीण व शहरी या दोन्ही भागातील खेळाडूंचा उत्तम समन्वय साधता येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०३६च्या ऑलिम्पिकसाठी भारताकडून आयोजन करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय पातळीवर ठेवलेला आहे. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जर त्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास आपल्याला भरघोस मेडल्स व पारितोषिके मिळवायची असतील तर त्यासाठी खेळाडूंना तयारी करण्याच्या दृष्टीने डेरवण सारख्या क्रीडा संकुलासारखी सुसज्ज क्रीडा संकुले देशभरात उभारण्याची गरज आहे. त्या दृष्टीने सरकारनेसुद्धा पावले उचललेली आहेत. खेलो इंडियासारखे प्रकल्प उभारून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून नवीन खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणे गरजेचे बनले आहे. अशी माहिती माजी राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अजित गाळवणकर यांनी दिली.