डेरवण यूथ गेम्स वॉल क्लाइंबिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या विद्या व्हॅली स्कूलला विजेतेपद

  • By admin
  • March 19, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

चिपळूण : डेरवण येथे सुरू असलेल्या ११व्या डेरवण यूथ गेम्स स्पर्धेत घेण्यात आलेल्या वॉल क्लाइंबिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्या व्हॅली स्कूलने ३ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य अशी पदके मिळवून विजेतेपद पटकावले.

पुणे येथील राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल आणि लोणावळा येथील डेल्ला ॲडव्हेंचर यांनी १ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक अशी प्रत्येकी ३ पदके प्राप्त करून उपविजेतेपद संपादन केले. लोणावळा येथील शिवदुर्गा क्लाइंबिंग वॉल केवळ १ सुवर्ण पदक मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिले आहे. पुणे येथील दीपक पवार इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स क्लाइंबिंगला केवळ एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत विद्या व्हॅली स्कूल (पुणे), विद्या व्हॅली स्कूल (पिंपरी-चिंचवड), राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल (पुणे), जिल्हा परिषद शाळा (लोणावळा), डेल्ला ॲडव्हेंचर (लोणावळा), शिवदुर्गा क्लाइंबिंग वॉल (लोणावळा), दीपक इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स क्लाइंबिंग (पुणे), एसव्हिजेसीटी (डेरवण), गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल (ठाणे), न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (रत्नागिरी), सह्याद्री शिक्षण संस्था (सावर्डे) व एसईएस इंग्लिश मीडियम स्कूल (रायगड) अशा एकूण १२ क्लब व शाळांनी सहभाग नोंदविला होता. 

१२ वर्षांखालील मुलांमध्ये २१, पंधरा वर्षांखालील मुलांमध्ये ७ व १८ वर्षांखालील मुलांमध्ये ४ अशा एकूण ३२ मुलांनी सह‌भाग घेतला होता. तर १२ वर्षांखालील मुलींमध्ये १२, पंधरा वर्षांखालील मुलींमध्ये ६ व १८ वर्षांखालील मुलींमध्ये ४ अशा एकूण २१ मुलींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मुले-मुली मिळून एकूण ५३ स्पर्धकांनी सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *