
लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक क्रिकेट ः मधुर पटेल सामनावीर, मंगेश निटूरकरची प्रभावी कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः लाईफलाईन-मास्सिया औद्योगिक टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत मास्सिया अ संघाने एआयटीजी संघावर ५७ धावांनी मोठा विजय नोंदवत उपांत्य फेरी गाठली आहे. या लढतीत मधुर पटेल याने धमाकेदार ८१ धावांची खेळी करत सामनावीर किताब पटकावला.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा होत आहे. प्रकाशझोतात झालेला हा सामना बुधवारी मध्यरात्रीपर्यंत रंगला होता. मास्सिया अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. मधुर पटेलच्या तुफानी ८१ धावांच्या खेळीने मास्सिया अ संघाला २० षटकात चार बाद १९३ अशी भक्कम धावसंख्या उभारुन दिली.

मधुर पटेल याने अवघ्या ३५ चेंडूत ८१ धावांची वादळी खेळी केली. या आक्रमक अर्धशतकी खेळीत मधुर याने सहा उत्तुंग षटकार व सात चौकार मारले. उबेर काझी याने ३० चेंडूत ३९ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने सहा चौकार मारले. मयंक विजयवर्गीय याने ३१ चेंडूत ३८ धावांची दमदार खेळी केली. त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. गोलंदाजीत मंगेश निटूरकर याने प्रभावी कामगिरी बजावली. मंगेश याने ४ षटकात केवळ २३ धावा देत तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हितेश पटेल (१-६) व रोहन राठोड (१-१९) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
शुक्रवारी (२१ मार्च) उपांत्य सामने होणार आहेत आणि अंतिम सामना २३ मार्च रोजी होणार असल्याची माहिती स्पोर्ट्स सेक्रेटरी अजिंक्य पाथ्रीकर यांनी दिली. उपांत्य सामन्यात मास्सिया अ संघाचा सामना एनआरबी संघाशी होणार आहे. डीबीए आणि ग्रामीण पोलिस यांच्यात उपांत्य सामना होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः मास्सिया अ संघ ः २० षटकात चार बाद १९३ (मुकीम शेख २३, मधुर पटेल ८१, रुद्राक्ष बोडके ३६, रोहन शाह २१, शुभम मोहिते नाबाद २०, इतर १२, रुषी बिरोटे १-४३, प्रणय भोयर १-४०, आदर्श बागवाले १-२५) विजयी विरुद्ध एआयटीजी संघ ः २० षटकात सात बाद १३६ (कुणा जांगडे ७, उमेर काझी ३९, मयंक विजयवर्गीय ३८, आदर्श बागवाले १०, जेके १०, नितेश विंचुरकर ९, डीके नाबाद ८, मंगेश निटूरकर ३-२३, धर्मेंद्र वासानी १-२६, रोहन राठोड १-१९, हितेश पटेल १-६). सामनावीर ः मधुर पटेल.