
नागपूर ः ग्रेटर नोएडा येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नागपूरच्या प्रतिमा बोंडे हिने सुवर्णपदक पटकावले.
ग्रेटर नोएडा येथील एमिटी युनिव्हर्सिटी कॉम्प्लेक्स येथे २२वी सीनियर व १७वी ज्युनियर राष्ट्रीय पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेत नागपूरच्या प्रतिमा बोंडे हिने ५० किलो वजन गटात सहभाग घेतला होता. या वजन गटात प्रतिमा बोंडे हिने ८६ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. प्रतिमा सातव्यांदा राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन बनली आहे.
प्रतिमा बोंडे ही मुनीश्वर हेल्थ क्लबमध्ये प्रशिक्षण घेत आहे. इंडियन पॅरा पॉवरलिफ्टिंग आणि द्रोणार्जुन पुरस्कार प्राप्त विजय मुनीश्वर यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्र राज्य पॅरालिम्पिक असोसिएशनचे पदाधिकारी मनोज बाळबुधे व शिवम नाईक, श्रीपाद यांनी प्रतिमाचे अभिनंदन केले आहे.