आपल्या पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आदर करा ःदिलीप वेंगसरकर

  • By admin
  • March 20, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

 मांडवी मुस्लिम्स संघाला विजेतेपद 

मुंबई : तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटर होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत घ्यावी लागते, त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला विसरून चालणार नाही. कारण जवळपास नेहमीच त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. त्याच बरोबर तुमचे प्रशिक्षक देखील तुम्हाला छोट्या वयापासून प्रशिक्षण देताना आणि तुमचे मार्गदर्शक म्हणून तुम्ही उच्च दर्जावर पोहोचण्यासाठी कठोर मेहनत घेत असतात. त्यामुळे आपल्या पालकांचा आणि प्रशिक्षकांचा नेहमीच आदर करा असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी ड्रीम ११ कप या १२ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना सांगितले. 

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या माहुल येथील अकादमीच्या मैदानावर संपन्न झालेल्या या स्पर्धेत मांडवी मुस्लिम्स या संघाने विजेतेपदाला गवसणी घालताना प्रतिस्पर्धी ओम साई क्रिकेट अकादमी संघावर चार विकेट्सनी विजय मिळविला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ओम साई क्रिकेट अकादमी संघाला ४० षटकांच्या या सामन्यात २७.५ षटकांत सर्वबाद ८९ धावांचीच मजल मारता आली. ६ बाद २८ अशा कठीण परिस्थितीतून आयुष नाईक (१२) आणि कर्णधार पार्थ देवळेकर (४३) या जोडीने २८ धावांची भागीदारी केल्याने त्यांना किमान ८९ धावांची मजल मारता आली. ओम साई क्रिकेट अकादमीतर्फे स्पर्श (जुनिअर) संघारे याने २२ धावांत ३ बळी मिळवले तर आदित्यराज सिंग (९ धावांत २ बळी) आणि कनिष्क साळुंखे (११ धावांत २ बळी) यांनी प्रत्येकी २ बळी मिळविले. 

या आव्हानाचा पाठलाग करताना मांडवी मुस्लिम्स संघाचेही २९ धावांत ४ फलंदाज तंबूत परतले होते. मात्र टी. विवान (२३) आणि कर्णधार ध्रुव सोनार (१७) यांनी पाचव्या विकेटसाठी २५ धावांची मोलाची भागी रचली आणि त्यानंतर रणवीर सिंग याने नाबाद १४ धावांची उपयुक्त खेळी करून आपल्या संघाचा विजय निश्चित केला.

अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्पर्श संघारे याची निवड करण्यात आली तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून मांडवी मुस्लिम्स संघाच्या ध्रुव सोनार (९ बळी आणि ९५ धावा) याला गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून कोळी क्रिकेट फाऊंडेशनच्या देवांग कोळी (२४१ धावा) याला तर स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून स्पर्श संघारे याला आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून आरुष कोसंबीया (ओम साई क्रिकेट अकादमी, ६ झेल) यांना गौरविण्यात आले. दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत तीन शतकांची नोंद झाली,

संक्षिप्त धावफलक ः ओम साई क्रिकेट अकादमी ः २७.५ षटकांत सर्वबाद ८९ (आयुष नाईक १२, पार्थ देवळेकर ४३, स्पर्श संघारे २२ धावांत ३ बळी, आदित्यराज सिंग ९ धावांत २ बळी, कनिष्क साळुंखे ११ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध मांडवी मुस्लिम्स ः २७.५ षटकांत ६ बाद ९० (टी विवान २३, ध्रुव सोनार १७, रणवीर सिंग नाबाद १४). सामनावीर ः स्पर्श संघारे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *