
आरती दसगुडे, भक्ती पवारची प्रभावी गोलंदाजी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित महिला सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत एमसीए रेड संघाने छत्रपती संभाजीनगर महिला संघावर पाच विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या सामन्यात भक्ती पवार हिने सामनावीर किताब संपादन केला.
डेक्कन जिमखाना मैदानावर हा सामना झाला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय संघाला महागात पडला. छत्रपती संभाजीनगर महिला संघाचा डाव ३३.४ षटकात ९८ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर एमसीए रेड महिला संघाने २९.२ षटकात पाच बाद १०२ धावा फटकावत पाच विकेटने सामना जिंकला.
या सामन्यात श्रुती पवार (२९), सरस्वती कोकरे (२८), रुतुजा गिलबिले (२२) यांनी सुरेख फलंदाजी केली. गोलंदाजीत आरती दसगुडे हिने अवघ्या पाच धावांत चार विकेट घेत सामन्याचे चित्र बदलून टाकले. भक्ती पवार हिने २६ धावांत तीन गडी टिपले. आरती केदार हिने १० धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक ः छत्रपती संभाजीनगर महिला संघ ः ३३.४ षटकात सर्वबाद ९८ (जिया सिंग ४, माधुरी आघाव ५, शितल देशमुख १४, श्रुती पवार २९, काव्या गुळवे ४, इतर १९, आरती दसगुडे ४-५, भक्ती पवार ३-२६, आरती केदार २-१०, सरस्वती कोकरे १-४) पराभूत विरुद्ध एमसीए रेड महिला संघ ः २९.२ षटकात पाच बाद १०२ (रुतुजा गिलबिले २२, भक्ती पवार नाबाद २२, सरस्वती कोकरे नाबाद २८, इतर २१, भूमिका चव्हाण २-२९, दिव्या जाधव २-१६, अक्षरा डांगे १-२३). सामनावीर ः भक्ती पवार.