
पुणे ः नन्नापत खोंचरोएनकाई (१००) हिच्या शानदार शतकाच्या बळावर थायलंड महिला संघाने महाराष्ट्र महिला संघाचा तब्बल २११ धावांनी पराभव केला.
एमसीए क्रिकेट मैदान २ वर हा सामना झाला. महाराष्ट्र महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. थायलंड महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात पाच बाद ३३१ असा धावांचा डोंगर उभा करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. महाराष्ट्र महिला संघ ४२.५ षटकात १२० धावांत सर्वबाद झाला. थायलंड महिला संघाने हा सामना २११ धावांनी जिंकला.
या सामन्यात थायलंडच्या नन्नापत खोंचरोएनकाई हिने १०२ चेंडूत १०० धावा फटकावत सामना गाजवला. तिने आपल्या शतकी खेळीत १२ चौकार मारले. फनीता माया हिने ६१ चेंडूत ७० धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. तिने नऊ चौकार व एक षटकार मारला. अंबिका वाटाडे हिने ५८ धावांचे योगदान दिले. तिने सात चौकार मारले. गोलंदाजीत सुलीपॉर्न लाओमी (३-२२), चानिदा सुथिरुआंग (२-११), फनाता माया (२-२६) या थायलंडच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत संघाला मोठा विजय मिळवून दिला.