
डेरवण यूथ गेम्स स्पर्धेचा शानदार समारोप
चिपळूण : खेळ हा आरोग्यासाठी किती महत्त्वाचा आहे. पुढील पिढी सुदृढ आणि सुसंस्कृत घडवायची असेल तर खेळाडू तयार होणे आवश्यक आहे. नेमके हेच काम श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून केले जात आहे. डेरवण यूथ गेम्स ही संकल्पना गेली १० वर्षे अविरतपणे राबवून ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंना खेळाच्या माध्यमातून विविध सुखसोयी उपलब्ध करून देणे; एकाच मैदानावर तब्बल सात ते आठ हजार खेळाडूंना एकत्र आणून विविध खेळाच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन देणे, म्हणजे माझ्यासाठी ऐतिहासिक, अद्भुत आणि अलौकिक गोष्ट आहे असे प्रतिपादन स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे विभागीय संचालक पांडुरंग चाटे यांनी केले.

डेरवण यूथ गेम्स २०२५च्या समारोप कार्यक्रम प्रसंगी पांडुरंग चाटे हे बोलत होते. यावेळी बोलताना चाटे म्हणाले की, तळागाळातील खेळाडूंना या यूथ गेम्सने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य चांगले राहिले तर आपले भविष्य उज्ज्वल होणार आहे. आणि आरोग्य उत्तम बनवायचे असेल तर खेळासारखा दुसरा व्यायाम नाही. दररोज प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी अर्धा तास खेळायला हवेच. यापुढे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशाला जास्तीत जास्त पदके प्राप्त करायची असतील तर आपल्याला अशा भव्य आणि सर्व सोयींनी युक्त अशा क्रीडा संकुलाची गरज आहे. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने उभारलेले हे क्रीडा संकुल देशस्तरावर दखल घेण्याजोगे आहे, असे पांडुरंग चाटे यांनी सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे प्रमुख विश्वस्त विकास वालावलकर, वैद्यकीय संचालक डॉ सुवर्णा पाटील, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, शिक्षण संचालक शरयू यशवंतराव, माजी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू अजित गाळवणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर यांनी प्रास्ताविक केले. पराडकर यांनी सांगितले की, डेरवण यूथ गेम्स ही संकल्पना आमची संस्था गेली १० वर्षे राबवत आहे. या ठिकाणी राज्यभरातून सुमारे सात ते आठ हजार खेळाडू या स्पर्धेच्या निमित्ताने येतात. यावर्षी कबड्डी, खो-खो, लंगडी या खेळांसह सुमारे १८ खेळांच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या. विजेत्या खेळाडूंना संस्थेच्या वतीने १६ लाखांची रोख पारितोषिके, १२०० पदके आणि ११५ करंडक मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. या वेळी इतर मान्यवरांनीदेखील मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी खांडेकर यांनी केले.