सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेची शानदार सुरवात

  • By admin
  • March 20, 2025
  • 0
  • 15 Views
Spread the love

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे ः ज्येष्ठ नागरिकांनी आनंदमयी जीवन जगण्यासाठी आपल्या आवडत्या क्रीडा स्पर्धा मध्ये नेहमी भाग घ्यावा, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावे व समाज जीवनाचा आनंद घ्यावा. सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम व योगा बरोबरच कॅरम सारख्या क्रीडा स्पर्धा बरोबरच इतर छंद जोपासावेत. क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन नियमित सराव वाढवावा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

या प्रसंगी कॅरमपटू विलास सहस्रबुद्धे, माधुरी सहस्रबुद्धे, एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संस्थांचे अध्यक्ष अजित गोखले, सचिव उर्मिला शेजवलकर यांची मुख्य उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्याध्यक्षा प्राजक्ता मोघे यांनी करून दिला. अध्यक्ष अजित गोखले यांनी पाहुण्यांचे पुषगुच्छ देऊन स्वागत केले.

पटवर्धन बाग येथील जेष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ज्येष्ठ नागरिकांच्या एकेरी कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली असून पुणे शहरांतून ११२ स्पर्धकांनी यात सहभाग घेतला आहे. स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात येत आहे. येत्या २३ मार्च रोजी स्पर्धेचा समारोप होणार आहे. 

स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी, मुख्य पंच अभय अटकेकर यांच्याबरोबर सतीश सहस्रबुद्धे, पंकज कुलकर्णी, माधव तिळगुळकर, सुनील वाघ, रामकुमार ठाकूर हे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

स्पर्धेचे महत्त्वाचे निकाल 

पंकज कुलकर्णी विजयी विरुद्ध नंदकुमार झगडे (२२- १५,२५- ८), सुनील शेजवलकर विजयी विरुद्ध सुब्रमण्यम अय्यर (१६-१३,२२-६), सतीश सहस्रबुद्धे विजयी विरुद्ध माधव देशमुख (१६-११,९- २६,१४-७), अजित गोखले विजयी विरुद्ध सुभाष चव्हाण (१८-२, १९-७), मिलिंद रानडे विजयी विरुद्ध पद्माकर मेढेकर (१४-११,१३-१२), माधव तिळगुळकर विजयी विरुद्ध अलकनंदा भानू (२५-०,२५-०), शुभदा गोडबोले विजयी विरुद्ध भारती आगाशे (१७-५,१७- ७), शिरीष जोशी विजयी विरुद्ध हेमा मांडके (९- १४,२१- ६,१६-५), वसंत रत्नपारखी विजयी विरुद्ध अरविंद देशपांडे (२२- ४,२०- ४), सुनील वाघ विजयी विरुद्ध मकरंद बेहरे (२१- ०,२१-०).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *