
सोलापूर शहरात आयोजन, संघाना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांची नावे
सोलापूर ः विजापूर रोडवरील नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर मराठा प्रीमियर लीग टेनिक बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ २६ मार्च रोजी सकाळी होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत पहिल्या दिवशी शहरी भागातील अ गटातील सर्व ४ संघांचे ६ सामने होणार आहेत.
सोलापूर येथील अंत्रोळीकर नगरमधील पुष्पस्नेह या सांस्कृतिक भवनाच्या हिरवळीवर सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुण होतकरू खेळाडूंसाठी प्रमुख आयोजक प्रशांत बाबर यांच्यावतीने आयोजित टेनिस बॉलवर खेळविण्यात येणाऱ्या मराठा प्रीमियर लीग सिझन २ साठीच्या शहर भागातील ८ संघातील खेळाडूंची लिलाव प्रकियेद्वारे निवड करण्यात आली.
या कार्यक्रमात स्पर्धेसाठी बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या चषकांचे अनावरण आणि स्पर्धेतील शहर व ग्रामीण भागातील १६ संघांच्या जर्सीचे देखील अनंत जाधव, विनोद भोसले, रणजित चवरे, राम साठे, सुनीलबापू जाधव, रवी भोपळे व आयोजक प्रशांत बाबर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रारंभी उत्तर सोलापूर तालुक्यातील मराठा उद्योजक प्रल्हाद काशीद, गणेश सावंत व राम साठे या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजेंच्या घोषणात लिलाव प्रक्रियेला थाटामाटात सुरुवात करण्यात आली. आयोजक शंकर पवार, आमोघ जगताप, सागर गव्हाणे, रोहित जाधव यांच्या वतीने लिलाव प्रक्रियेसाठी मंचावर सर्व गोष्टींची व्यवस्था अत्यंत चोख करण्यात आली होती.
शहरी भागातील ८ संघांना शिवनेरी, सिंहगड, पन्हाळगड, तोरणा, विजयदुर्ग, प्रतापगड, सिंधुदुर्ग व राजगड अशी नावे देण्यात आली असून या आठ संघांची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील आठ संघांना सज्जनगड, पुरंदर, सुवर्णदुर्ग, रामशेज गड, प्रबळगड, अजिंक्यतारा, लोहगड व विशाळगड अशी नावे देण्यात आली असून त्यांचा समावेश क व ड गटात करण्यात आलेला आहे. शहरी भागातील संघांच्या लिलाव प्रक्रिया करिता २१० मराठा खेळाडूंची नोंदणी झाली होती. या खेळाडूंना संघांचे प्रायोजक-मालक व कर्णधार यांच्या उपस्थितीत १ लाख पॉइंट्स मध्ये लिलाव पद्धतीने संघात घेण्यासाठी प्रत्येक खेळाडूचे नाव, फोटो मंचावरील स्क्रीनवर दाखवून तसेच घोषणा करून योग्य ती विभागणी करण्यात आली. प्रत्येक संघात १५ खेळाडू असणार आहेत.
शहरी भागातील आठ संघांचे प्रायोजक-मालक अमोल भोसले, सुनील चव्हाण, सचिन मगर, विक्रांत वानकर, रवी भोपळे, संभाजी केत, रणजित मुळीक, वैभव जाधव यांचे समवेत त्यांचे संघ कर्णधार सागर गव्हाणे, नितीन गायकवाड, बाळकृष्ण काशीद, चेतक गोरे, रोहित जाधव हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद गोरे यांनी केले. लिलाव प्रक्रियेचे कामकाज अजित शापूरकर यांनी पाहिले. स्पर्धेतील सर्व खेळाडूंसाठी लागणारे टी-शर्ट हे प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या वतीने देण्यात आले असून सोलापूरचे के टी पवार व विक्रांत पवार यांच्या वतीने विजयराव केशवराव मुळीक यांच्या स्मरणार्थ प्रथम, देविदास पवार यांच्या स्मरणार्थ द्वितीय, अंबादास पवार यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक चषक देण्यात आले आहेत. सोलापूरचे प्रसिद्ध डॉ सुमित मोरे यांच्या कडून मालिकावीर खेळाडूसाठी रोख १० हजार ३९४ रुपये, योगेश गवळी यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यासाठी ५३९४ रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. तसेच स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सामनावीरासाठी नमेंद्र साखरे आणि मिलिंद गोरे यांचे कडून ट्रॉफी व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
अमर कारंडे सर्वात महागडा खेळाडू
मराठा प्रीमियर लीग मधील शहरी भागातील संघांसाठी घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये अमर कारंडे याला सर्वाधिक ५२ हजार पॉइंट्सने विजयदुर्ग संघाने तर सत्यजित जाधव याला ५० हजार पॉइंट्सने राजगड व सौरभ जाधव याला शिवनेरी संघाने ३८ हजार पॉइंट्स मध्ये घेतले. असे हे तीन खेळाडू सर्वोच्च पॉइंट्सने लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त पॉइंटला संघांनी घेतले. एकूण २२० खेळाडूंपैकी १२० खेळाडू लिलाव प्रक्रियेतून संघांनी घेतले आहेत.